असेही एक मिशन!

 

त्याने प्रियाला कडेवर घेतले. क्वारंटाईन मध्ये जाण्यापूर्वी त्याने एकदा प्रियाला जवळ घेतले.
“बाबा, परत केव्हा येणार?”
“प्रिया, जाणाऱ्याला केव्हा येणार असं नाही विचारायचं”. कौमुदी म्हणजे प्रियाची आई आणि राबर्टोची पत्नी. हो ती अगदी मराठी होती.
“बरं प्रिया, सांग तुला काय आणू?”
“मी मागितलं तर आणाल? तर मग चाँदवा, मुठभर चांदणे घेऊन या. गिव मी माय मूनशाईन.”
“डन!.”
तो मिशन वरून परत आला तेव्हा त्याला हे सगळे आठवत होते.
“प्रिया आहा. बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे.”
प्रिया  दुडू दुडू धावत आली.
त्याने मुठ उघडली.
हजारो सूर्यांपेक्षांही तेजस्वी प्रकाशाने आसमंत झाळाळले.

Brighter than thousand Suns!
एका प्रचंड स्फोटाने दाही दिशा थरथरल्या.
आणि नंतर मिट्ट काळोख.

 

मिशनवर जायच्या आधी सात दिवस क्वारंटाईनमध्ये जावे लागते. हेतू हा कि कोणताही अवकाश यात्री ऐनवेळी आजारी पडल्यामुळे मिशन पुढे ढकलायला लागू नये. एकूण तिघे जण होते. केके, राबर्टो, आणि शर्ली.. राबर्टोची  अवकाशातली ही दुसरी भरारी होती. शर्लीची पहिली. केके मात्र अनुभवी होता. म्हणूनच तो मिशन कमांडर होता.
मिशनचे उद्दिष्ट हे होते कि ह्या यानाची चाचणी घेणे. ह्या यानाची एक यशस्वी चाचणी तर आधी झाली होतीच, पण त्या चाचणीच्या वेळी कोणी अवकाश यात्री नव्हता. म्हणजे अनमॅन्ड. ह्या चाचणीत तीन अवकाश यात्री प्रवास करणार होते. ह्या चाचण्या का केल्या जात होत्या? एक म्हणजे ह्या यानाची बांधणी नवीन प्रकारची होती. म्हणजे सामान वाहून नेण्याची क्षमता जास्त होती. हेच यान दोन वर्षांनंतर चंद्रावर चढाई करण्यासाठी वापरायचे होते.
अक्च्युअलि चंद्रावर मानवी वसाहत बांधण्याचा एक भव्य दिव्य प्रोग्रॅम होता, तेव्हा पुढच्या यात्रेच्या वेळी पाच अवकाशयात्री आणि बेस कॅंप उभारण्याचे सामान इतके पे लोड घेऊन चंद्रावर उतरावयाचे होते. त्यासाठी सारा खटाटोप.
तिघांनी आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन क्वारंटाईनमध्ये प्रवेश केला. तिघांच्याही वैद्यकीय तपासण्या झाल्या होत्या.
क्वारंटाईनमध्ये अवकाशयात्री आपल्या पत्नीशी अथवा पतीशी भेटू शकतो. अर्थात मिशनच्या मेडिकल टीमची सहमती असेल तरच. पण लहान मुले? नो नो. अजिबात नाही.
सात दिवसांच्या क्वारंटाईन पिरिअडमध्ये पहिले पाच दिवस मिशनच्या नियमात बसेल तेच जेवण खावे लागते. शेवटचे दोन दिवस मात्र तुमच्या आवडीचे खाणे  मिळते. कारण एकदा अवकाशात गेलात कि मग चमचमीत खाणे बंद. केकेला खाण्या पिण्यात काही रस नव्हता. राबर्टोने चिकन, तर शर्लीने पिझ्झा मागवला होता! जैसे जिसकी सोच!
आता थोडे अवकाशयात्रींच्या बॅकग्राउंड बद्दल. केके हा ४५ वर्षाचा, एअर फोर्स मधला, सुपरसॉनिक फायटर प्लेनचा पायलट होता. त्यानंतर तो शत्रूच्या प्रदेशात रेको करणारा पायलट झाला. MACH ३.४+ वेग आणि ३०,००० मीटरवर उड्डाण करणारा. नंतर तो XXX मध्ये दाखल झाला होता राबर्टो हा यानाच्या आतल्या सिस्टीमचा तंत्रज्ञ होता तर शर्ली शास्त्रज्ञ. डॉक्टर शर्ली असे म्हणायला पाहिजे खरतर पण एकदा तुम्ही मिशन मध्ये सामील झालात कि हे सर्व विसरायला होते.
उड्डाण स्थानीय वेळ 17:00 ला  होणार होते. ह्या मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला(ISS)जायचे होते. तिथे पे लोड डंप करायचे आणि शर्लीला काही नवीन प्रयोग सेटअप करायचे होते आणि काही जुने प्रयोग रीकॅलीब्रेट करायचे होते. अवकाशात चालावे लागेल कि नाही ह्याची कल्पना नव्हती. ते तिथे गेल्यावरच समजणार होते.
क्वारंटाईन पिरिअडमधले पहिले चार दिवस तुम्हाला तुमच्या झोपेचे वेळापत्रक जमवण्यात जातात. उड्डाण (म्हणजे लॉच आणि टेक-ऑफ), ISS बरोबर जोडणी(DOCKING), अवकाशातील चहल पहल आणि परत पृथ्वीवर हे मिशनचे महत्वाचे टप्पे. त्यावेळी सर्व क्रूने टकटकीत जागे रहायला पाहिजे. ह्या साठी थोडी प्रॅक्टिस करावी लागते. जास्त नाही पण चार दिवसात जमून जाते.

उड्डाण YYY अवकाश स्थानकावरून(Spaceport) होणार होते.
स्थानिक वेळ 14:33. म्हणजे T-2 तास 30 MINUTES. (T म्हणजे LAUNCH TIME)
राबर्टो जमिनी पासून ५० मीटर उंचीवर यानाच्या वरच्या टोकापाशी उभा होता. काय विचार करत असेल तो.
नेमका हाच प्रश्न शर्लीने त्याला विचारला.
कसला विचार करतो आहेस? प्रियाचा न?
शर्ली तीन चार वेळा घरी आली होती. तिची आणि प्रियाची चांगली गट्टी जमली होती.
शर्ली, कधी कधी असे वाटतं कि आपण आपल्या मुलांच्या आशा आकांक्षा पुऱ्या करू शकू कि नाही? आपल्या मुलांच्यासाठी आपण काय ठेवा सोडून जाणार आहोत?  अशा वेळी खूप अस्वस्थ व्हायला होत बघ. ही जीवघेणी अनिश्चितता.
जेव्हा आपण तेथे जाऊ तेव्हा आपोआप सगळ्या कोड्यांचा उलगडा होईल. तुला श्रोडिंगरच्या मांजरीचा पॅराडॉक्स माहित आहे ना? जेव्हा वेळ येते तेव्हा नशिबाचा पेटारा उघडतो तेव्हा आपले दान काय आहे ते समजणार. आतापासून कशाला डोक्याला त्रास रे. मी बघ किती लकी आहे. पुढे कोण नाही मागे कोण नाही.
शर्लीची कथा...
आता कोण लकी आहे हे कोण ठरवणार? बंध असणे चांगले की वाईट? ही शर्ली  वरून दाखवते आहे ती आतून पण तशीच आहे का?
केकेची तिसरीच तऱ्हा. इतका वेळ मज्जा करणारा, गप्पिष्ट, अचकट विचकट बोलणारा, पेगवर पेग रिता करणारा गणेशन एकदा मिशनचा काऊंट डाऊन सुरु झाला कि एकदम शांत होत असे. प्रशांत महासागारा सारखा. कुठल्याही इमर्जन्सीत शांत राहणारा. तो बाजूला असला कि अर्धे टेन्शन खतम होत असे. 
अशा तिघांची सांगड दैवाने का बरं घालावी?
राबर्टोने असले फिलॉसॉफिकल विचार झटकून टाकले.
मिशन वरून परत आल्यावर मिशनच्या मनोवैज्ञानिकाला भेटायला पाहिजे.
दूर क्षितिजावर कुठेतरी काळे ढग दाटून आले होते. वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे अजून दोन तासांची स्लॉट उघडी होती म्हणजे वादळ इथपर्यंत पोहोचायला निदान दोन तासांचा –जास्तच पण कमी नाही-अवधी होता. विजांच्या वादळात उड्डाण करायचे कि नाही? केके म्हणाला कि एक तातडीची मीटिंग झाली होती आणि एक मतानुसार गो अहेड चा निर्णय झाला होता.
यान विजेच्या वादळापासून पूर्ण सुरक्षित होते.
ZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZZ
पृथ्वीची विविध रूपे. त्याला कल्पना होती कि आपण थोड्याच कालावधीनंतर परत येणार आहोत. आता हे वादळ!
राबर्टोने आयुष्यात काय कमी वादळे बघितली होती? पण आजच्या वादाळाची सर त्याना येणार नव्हती. तो अनिमिष नेत्रांनी त्या वादळाकडे बघत राहिला. प्लॅनेट पृथ्वी! पृथ्वीवरचे आवाज, निसर्गाची विविध रूपे, रौद्र, सौम्य आणि मनभावन! ते डोंगर, त्या नद्या...
राबर्टो, कम ऑन थिंक ऑफ टास्क्स अहेड.”
सेंटीमेंटल होण्यासाठी आयुष्य पडले आहे.
कोणीतरी त्याला रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते.
एका क्षणात
राबर्टो “शुद्धी”वर आला.
त्याने सिम्युलेटरवर प्रॅक्टिस केलेल्या उड्डाण प्रक्रियेची उजळणी करायला सुरवात केली.
उड्डाण करायला अडीच तासांचा अवधी होता. केबिन मध्ये आपापल्या जागांवर स्थानापन्न झाल्यावर अवकाशयात्रींच्या सहयोगाने लॉंचटीमला अनेक सिस्टीमची प्राथमिक चाचणी करायची असते.
वादळाची पूर्वसूचना असतानाही(आणि बहुतेक वादळ उड्डाणाच्या नेमक्या क्षणीच येणार असतानाही) वरिष्ठांनी उड्डाणाला “गो अहेड” दिला होता. कारण ISS वर जायचे असेल तर नेमकी वेळ साधायची असते आणि ही टाईम स्लॉट –विंडो- केवळ पाच मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळ उघडी असते. पृथ्वी भोवती फिरणाऱ्या ISS किंवा चंद्र आणि पृथ्वीवर उभे असलेले यान ह्यांच्या जागा जेव्हा एका विविक्षित ठिकाणी येतात त्याच वेळी यानाने अवकाशात झेप घ्यायची असते. इतकी तयारी केल्यावर उड्डाण पुढे ढकलावे लागू नये ही सगळ्यांचीच इच्छा असते.    
आता केबिनमध्ये प्रवेश करायची वेळ आली होती. प्रवेश ठराविक क्रमानेच करायचा असतो. प्रथम डाव्या बाजूला बसणारा/री म्हणजे शर्ली, नंतर उजव्या बाजूला बसणारा
राबर्टो आणि शेवटी कमांडर केके. ह्या क्रमाने त्यांनी यानात प्रवेश केला.
उड्डाणाच्या वेळी अवकाशयात्री  पृथ्वीवर परतताना जे यान वापरले जाते त्यात  म्हणजे रीएन्ट्री मॉड्युलमध्ये बसतात. यानात निरनिराळी साधने इतक्या दाटी दाटीने बसवलेली असतात कि थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी यानातील उपकरणांचे नुकसान होण्याची भीति! थोडे सव्यापसव्य केल्यावर अखेर मंडळी आपापल्या जागेवर पोहोचली.
राबर्टोच्या पायाखाली काही हालचाल होत होती त्याची जाणीव त्याला झाली. अतिशीत द्रवरूप ३०० टन ऑक्सिजन आणि केरोसीन इंधन सारखे उकळत होते. यानाच्या हृदयाची जणू धडकन् जणू!
त्याला क्षणभर वाटले कि यान जिवंत झाले आहे. आपल्या प्रमाणे तेही उड्डाणासाठी उत्सुक होते.
पुन्हा
सेंटीमेंटल!
कधी कधी त्याला वाटायचे कि आपण खरं तर लेखक व्हायला पाहिजे होतं. हे काय आपण इथे यानात बसून वाट बघत आहोत?
त्याने पुन्हा स्वतःला सावरले.
स्थानापन्न झाल्यावर सर्वात आधी
अंतराळ पोशाकाशी(Space Suit) दोन विजेच्या तारांची आणि नळ्यांची जोडणी करावी लागते. विजेची एक केबल  संभाषणासाठी हेडसेटशी जोडलेली असते. तर दुसरी वैद्यकीय उपकरणाशी जोडलेली असते. हृदयाचे ठोके आणि श्वास-उत्श्वास यांच्या मोजमापासाठी. दूर कंट्रोल सेंटर मध्ये डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवत असतात.
दोन नळ्यापैकी एक थंड हवेसाठी होती तर दुसरी शंभर टक्के शुद्ध प्राणवायूसाठी.
अजून एक! उड्डाणाच्या आधी प्रत्येक विश्वयात्रीला (कॉस्मोनॉट!)ला त्याच्या
आवडीची, त्याने निवडलेली तीन गाणी ऐकवण्याची प्रथा आहे.
राबर्टोने कुठली गाणी निवडली असावीत? सर्वात आधी त्याने ‘Don’t Stop Me Now’ आणि ‘Beautiful Day’ही गाणी निवडली होती. ती लावली गेली. त्याच्या मनात राहून राहून हेच विचार येत होते.
I don't care, go on and tear me apart
I don't care if you do, ooh-ooh, ooh
'Cause in a sky, 'cause in a sky full of stars
I think I see you
I think I see you

शेवटी
कौमुदी आणि प्रियाने  गाइलेली पसायदान ही प्रार्थना त्याने घरी रेकॉर्ड केली होती, ती त्याला ऐकवली गेली. दुर्दैवाने राबर्टोला मराठी समजत नव्हते. पण एव्हढे मात्र खरं होते कि पसायदान ऐकल्यावर (कौमुदीने त्याला त्याचा अर्थ समजून सांगितला होता.) त्याच्या चित्तवृत्ति शांत झाल्या.
(स्पेस सेंटर मधून निघून अवकाश यानात बसण्या पर्यंत अनेक गमतीदार रूढी पाळल्या जातात. त्या इथे लिहिल्यातर ह्या कथेला विनोदाची झालर लावली जाईल, तसे काही होऊ नये म्हणून मी त्या इथे लिहिणार नाहीये.)
आता परायाची वेळ जवळ येत होती.
प्रयाणाच्या काही सेकंद आधी केके लाईनवर आला. “T-झिरो साठी तयार रहा.”
“येस सर,”
राबर्टो आणि शर्ली एक मुखाने बोलले.
T-६ सेकंद्स! main engines ignited.
एखादी गगनचुंबी इमारत भूकंपात हादरते, थरथरते, हेलकावे खाते त्याप्रमाणे संपूर्ण यान हादरत होते.
T-झिरो बूस्टर्स फायर झाले आणि यान पृथ्वीवरून आकाशात झेपावले. त्या लिफ्टऑफ क्षणी
राबर्टोला वाटले कुणी जणू पेकाटात प्रचंड लाथ मारली आहे.
बाय बाय गुड अर्थ!
पुन्हा भेटूच!
यानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रवेगाच्या(g) अडीच पट प्रवेगाने अंतर कापायला सुरवात केली. यान काही क्षण 4g पर्यंतही जाते, पण साधारणपणे 3g च्या आसपास रहाते. यानाच्या सुरक्षितते साठी.
ह्या प्रवेगाने राबर्टोला आपले वजन 250 Kg झाले आहे असे वाटले. श्वास घेणे पण अवघड झाले होते. हात हलवणे तर बाजूला राहिले. छातीवर मणामणाचे दोन गोरीले बसले असावेत अशी फीलिंग आली. राबर्टोला ह्याची जाणीव होती कि अपोलो, मर्क्युरी, जेमिनी मध्ये त्याच्या आधीच्या अवकाश यात्रींनी 7g पर्यंत प्रवेगाचा अनुभव घेतला होता. ह्यावर काही इलाज नव्हता. सहन करण्याशिवाय. एकच आशेचा किरण होता कि काही सेकंदांनंतर गोष्टी पुन्हा नेहमी प्रमाणे होणार आहेत.
दोन मिनिटांनंतर कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि पहिली स्टेज  यानापासून अलग झाली. राबर्टोचे रॉकेट हे तीन स्टेजचे होते. पहिल्या स्टेजचे इंधन वापरून झाले कि यानाचे वजन कमी करण्यासाठी ती स्टेज अलग करण्यात येते. यावेळी प्रवेग एकदम कमी होतो. राबर्टो पुढे फेकला गेला. पोटाचे स्नायू आक्रसले गेले. हृदयाचे ठोके 130 पर्यंत वाढले. श्वासोच्छ्वासाची नवी पद्धत त्यांना ट्रेनिंग मध्ये शिकवली गेली होती. त्याचा उपयोग करण्याची हीच वेळ होती. दुसरी स्टेज जेव्हा  फायर झाली तसा पुन्हा एकदा 3gचा झटका बसला.
असा प्रकार पुन्हा एकदा होणार होता.
दुसऱ्या स्टेजला जेव्हा gचा फोर्स 1.5g होता तेव्हा केकेने कॅमेरा स्विचऑन केला. 1.5g असल्याने केके हात हलवून कॅमेरा स्विचऑन करू शकला.
आता पृथ्वीवर कंट्रोल सेंटरला सर्व यात्रींचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले.
कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. राबर्टोला वाटले  शर्लीची विचारपूस करावी. पण ते शक्य नव्हते.
आता रॉकेट जवळ जवळ हॉरीझॉंटल झाले होते. तिसऱ्या स्टेजचाही त्याग करण्यात आला होता. यान आता पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले होते. एकाएकी वस्तू हवेत तरंगायला लागल्या होत्या!
हेडफोनवर केकेचा आश्वासित करणारा आवाज आला.

We’re in space—and we’re alive!”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

केके, राबर्टो आणि शर्ली ह्यांनी ISS वरची आपापली कामे पूर्ण केली होती. अवकाश स्थानाकात आधीच तीन अवकाशयात्री निवासी होते. त्यांनी केके आणि कंपनीचे स्वागत केले, त्यांच्या कामात मार्गदर्शन केले, गरज होती तेव्हा मदतीचा हात दिला.
ISS वर असताना राबर्टोला प्रिया आणि कौमुदीशी बोलायची संधी मिळाली.
“बाबा कसे आहात? काय करताहात? आमची आठवण येते आहे का? वरून पृथ्वी कशी दिसते आहे?”
राबर्टोने खिडकीतून बाहेर डोकावले. स्पेस स्टेशनवर खाली आणि वर ह्या कल्पना निरर्थक असतात. आपले डोके जिकडे असते ती दिशा म्हणजे “वर” आणि पाय जिकडे असतात ती दिशा म्हणजे “खाली.” सर्वजण हवेत तरंगत असल्याने प्रत्येक अवकाश यात्रीचे “खाली –वर” निरनिराळे.
खाली पृथ्वी तरंगत होती. त्या निळ्या गोलावर प्रिया आणि कौमुदी त्याची वाट पहात होती. एव्हढा एकच विचार त्याच्या मनात होता.
“प्रिया, तू मला दिसते आहेस. गुलाबी फ्रॉक तुला अगदी गोड दिसत आहे...”
कौमुदी हसायला लागली.
“तुम्ही अगदी चंद्रावर गेलात तरी काडीमात्र बदलणार नाही.”
शब्द अगदी तुटक तुटक थांबून थांबून येत होते.
फोन बंद झाला.
सगळ्यांना आता परतीचे वेध लागले. विशेषतः राबर्टो
ला. शर्लीचे  थोडे काम अजून उरले होते.
अखेर परतीचा प्रवास सुरु झाला. जेव्हा यान पृथ्वी भोवती फिरत असते तेव्हा त्याचा वेग 28,350 किलोमीटर पर अवर असतो. हा वेग हळू हळू म्हणजे 325 किलोमीटर पर अवर प्रमाणे कमी कमी केला जातो.
यान जेव्हा पृथ्वीच्या atamosphere मध्ये प्रवेश करते तेव्हा यानाचा आणि हवेच्या घर्षणाने यानाच्या बाहेरच्या बाजूचे तापमान प्रचंड वाढते. केके परतीच्या प्रवासाचे सर्व टप्पे कौशल्याने हाताळत होता. यावेळी
राबर्टो आणि शर्लीला काही काम नव्हते. परताताना यानाचे काही भाग अलग होतात, त्यावेळी  झटके बसतात. पण राबर्टोचे त्याच्या कडे अजिबात लक्ष नव्हते. प्रिया आणि कौमुदीच्या विचारातच तो मग्न होता.
अखेर पृथ्वीपासून अकरा किलोमीटरवर हवाई छत्री उघडली आणि यान सुखरूप पृथ्वीवर उतरले.
तिघांनी यानातून बाहेर उड्या मारले. वाकून पृथ्वीचे चुंबन घेतले. यात्रेची यशस्वी सांगता केली म्हणून देवाचे आभार मानले. नंतर तिघे एकत्र तिहेरी आलिंगनबद्ध झाले. आवेग ओसरेपर्यंत जमिनीवरील रेस्क्यू क्रूने त्याना वेळ दिला.
स्पेसपोर्टवर राष्ट्राध्यक्ष सपत्नीक त्यांचे स्वागत करायला हजर होते. त्याव्यतरिक्त अनेक उच्चाधिकारीही हजेरी लावून होते.
राबर्टोला लांबूनच कौमुदी आणि प्रिया दिसत होते. त्यांना केव्हा एकदा भेटेन असे झाले होते.
अखेर गळाभेटीचा तो क्षण आला.
“प्रिया आहा. बघ मी तुझ्यासाठी काय आणले आहे.”
प्रिया  दुडू दुडू धावत आली.
त्याने मुठ उघडली.
हजारो सूर्यांपेक्षांही तेजस्वी प्रकाशाने आसमंत झाळाळले.

Brighter than thousand Suns!
एका प्रचंड स्फोटाने दाही दिशा थरथरल्या.
आणि नंतर मिट्ट काळोख.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
त्याच वेळी राष्ट्रीय TV वर बातम्या प्रसारित होत होत्या.
“कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे कि ISS कडे प्रस्थान करणारे  अवकाशयान उड्डाण केल्यानंतर दोन मिनिटे आणि सदतीस सेकंदांनंतर स्फोट होऊन दुर्घटना ग्रस्त झाले आणि महासागरात कोसळले. रेस्क्यू ऑपरेशन्स सुरु झाले आहे. रेस्क्यू टीम्स अपघातस्थळी पोचण्याचे प्रयत्न करत आहेत. पण विजेच्या वादळामुळे...”
“तीन अवकाशयात्रींपैकी कुणीही वाचण्याची शक्यता...”


साहित्यिक इनपुट https://learningenglish.voanews.com/a/an-occurrence-at-owl-creek-bridge-...
An Occurrence at Owl Creek Bridge' by Ambrose Bierce
किंवा
https://www.youtube.com/watch?v=4JKHCZIx75U

 


Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

नेव्हर लव ए स्ट्रेंजर