आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

तर सांगायचा मुद्दा हा की असे आमचे डॉक्टर अमानवीयआहेत.

थोड्याच दिवसानंतर सगळ्या पुण्याची मति गुंग करणारी

अभूतपूर्व घटना घडली. त्या अघटित घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या शिवाय बरका.

एके दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरांचा फोन आला, “प्रभुदेसाई, संध्याकाळी इकडेच चहा प्यायला ये. तुला गंमत दाखवायची आहे. माझा कॉर्नफ्लेक्स बनवण्याचा प्रयोग शेवटी यशस्वी होणार अस दिसतेय. तू ये आणि स्वतःच बघ.

म्हणजे डॉक्टरांना कोणीतरी साक्षीदार पाहिजे होता. मला बळीचा बकरा बनवायचे ठरवले होते एकूण. ठीक आहे. आपल्याला काय फरक पडतो? प्रयोग यशस्वी झाला तर फुकटांत मक्याच्या लाह्या मिळत असतील तर सोडा कशाला? असा विचार करून मी संध्याकाळी डॉक्टरांच्या बंगल्यावर पोचलो. डॉक्टर माझी वाट बघत होते.

अरे किती वेळ लावलास? बर ते जाउदे, तू स्टार ट्रेक बघतोस की नाहीस.डॉक्टरांनी प्रश्न केला.

स्टार ट्रेक ? ते काय असतं बुवा? मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. हा, मी स्टारडस्ट वाचतो मिळाला तर. सलून मध्ये नाहीतर आमच्या फॅमिली डॉक्टरच्या रिसेप्शन मध्ये.माझे उत्तर ऐकून डॉक्टर नाराज झाले.

तुम्ही कूपमंडूक कॉलनीकर! कधी कॉलनीच्या बाहेर पडता की नाही. स्टार ट्रेक ही विज्ञान कथेवर आधारलेली धारावाहिक आहे. तू बघ कधीतरी. त्यामध्ये रेप्लीकेटर नावाचे गॅजेट आहे. त्यामध्ये खायचा कुठलाही पदार्थ ताबडतोब तयार मिळतो. हे बिचारे स्टार ट्रेकवाले घरदार सोडून लाखो किलोमीटर दूर अवकाशांत मानवजातीचे रक्षण करण्यासाठी चकरा मारत असतात. त्यांना वडा पाव खावासा वाटला तर कोण करून देणार? खास त्यांच्यासाठी हे यंत्र बनवले गेले. अर्थात ह्या झाल्या भविष्यातल्या आणि विज्ञान कथेतल्या गोष्टी. मी प्रयोग करून आपल्या कॉलनीकरांसाठी असेच यंत्र बनवले. सध्या ह्यांत फक्त कॉर्नफ्लेक्स आणि चहा बनवणार आहे. पुढे मागे मी वडापाव, डोसा, इडली, मॅगी बनवायचा विचार करतो आहे.

डॉक्टरांच्या कल्पनाशक्तीला काही अशक्यप्राय नाही.

तुम्ही माझी उत्सुकता जास्त ताणू नका. चला येऊ द्या कॉर्नफ्लेक्स!

त्या आधी मला सांग. तू कॉलेजांत फिजिक्स केमिस्ट्री ह्यांचा अभ्यास केला आहेस?”
अकरावी पर्यत जेव्हढे शिकलो तेवढेच. आर्कीमेडीज. न्यूटन, मादाम मेरी क्युरी,-------”

बस्स, बस्स. इतके खूप झाले. हे बघ. सर्व सेंद्रिय पदार्थ –-- सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक बर कापदार्थ मुख्यता कार्बन, ऑक्सीजन, हायड्रोजन ,थोडा नायट्रोजन, चवीपुरते मिनरल. पाणी, क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाशाची उर्ज्वा वापरून वनस्पती आपल्यासाठी अन्न बनवतात. ती प्रक्रिया वापरून मी मका बनवतो, नंतर त्याच्या लाह्या फोडतो. सिंपल आहे ना?”

एकदम सिंपल आहे.माझे लक्ष पॉप कॉर्न कडे होते.

चल तुला माझे मशीन दाखवतो,” असे बोलून डॉक्टर

मला आतल्या खोलीत घेऊन गेले. डॉक्टरांचे मशीन वॉशिंग मशीनच्या आकाराचे असावे आणि तसेच दिसत होते. डॉक्टर मला सांगत होते,” हे ऑक्सीजन, हायड्रोजन, नायट्रोजनचे सिलिंडर इथे मशीनला जोडले आहेत. कार्बन म्हणजे आपण पूर्वी वापरायचो तो दगडी कोळसा ह्या फनेल मधून आंत पडतो. खनिजांचा एकत्र लगदा करून ह्या भांड्यांत इथे ठेवला आहे. सूर्यप्रकाशासाठी हा खास दिवा बसवला आहे. अजून काय राहिले? हा, ह्या भट्टीचे तापमान आणि आर्द्रता सुनियंत्रित करण्याची सोय आहे. आता आपल्याला पाहिजे त्या पदार्थाचे रासायनिक पृथक्करण घेऊन कॉम्प्युटरमध्ये लिहिले की हे मशीन तो पदार्थ आपल्याला देते. मी सध्या पॉप कॉर्न बनवण्याची कृती कॉम्प्युटरमध्ये भरली आहे. तुला पॉप कॉर्नचे रासायनिक पृथक्करण माहीत आहे? नाही ना, मी तुला सांगतो. पॉप कॉर्नमधे हायद्रोजन-----

डॉक्टर त्याची काही गरज नाही,” मी घाईघाईने

बोललो, “माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. शिवाय हातच्या कंकणाला आरसा कशाला. आता आपण पॉप कॉर्न खाणार आहोतच की.

डॉक्टरांनी मान डोलावली. अगदी बरोबर बोललास.चल आपण पॉप कॉर्न काढू.

डॉक्टर आता रंगात आले, “चीज पॉपकॉर्न खायचेत? आत्ता काढतो.आपल्याला काय चीज तर चीज! डॉक्टरांनी खिशातला संगणक कढून मशीनला चीज पॉप कॉर्नची ऑर्डर दिली. बघता बघता मशीनमधून माल बाहेर येऊ लागला. आम्ही दोन भांडी भरून चीज पॉप कॉर्न घेतले. खरं तर आता मशीन बंद व्हायला पाहिजे होते. पण पॉप कॉर्न येतच होते. डॉक्टरांनी खिशातल्या संगणकाची एकूण एक सर्व बटणे दाबून पाहिली. काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी मशीनवरची बटणे दाबली. घरातल्या विजेच्या उपकरणांची बटणे दाबली. एवढेच नव्हे तर शर्टाची आणि पॅंटची बटणे देखील दाबायची सोडली नाहीत.

मला वाटले की मशीन पॉप कॉर्न बनवण्यात रंगून गेले होते. पॉप कॉर्न बाहेर येत राहिले. सगळीकडे पॉप कॉर्नही पॉप कॉर्न! सगळी खोली पॉप कॉर्नने भरून गेली. पॉप कॉर्नची पातळी हळू हळू वाढू लागली. पॉप कॉर्न आमच्या कमरेपर्यंत आले. आता मात्र डॉक्टरांचा धीर खचला, “प्रभुदेसाई, हे मशीन सैतानी पॉप कॉर्न मॉन्स्टरझाले आहे. इथून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही. इथेच थांबलो तर पॉप कॉर्नमध्ये बुडून मरणारे पहिले आणि बहुधा शेवटचे मानवअशी आपली नावे इतिहासांत अजरामर होतील. पळ.

मी आणि डॉक्टर जे पळालो ते थेट बंगल्याच्या बाहेरच्या बागेत पोहोचलो. डॉक्टर पुढे, मी मागे. बंगल्याच्या उघड्या खिडकीतून पॉप कॉर्नचे लोट वहात होते. ते भयावह दृश्य पाहून माझी पांचावर धारण बसली. थोड्याच वेळात पूर्ण कॉलनी पॉप कॉर्नच्या महापुरांत बुडणार, नंतर पुणे, नंतर ? पण आता लोट हळूहळू थांबायला लागला होता. डॉक्टरांच्या चेहऱ्याची कळी खुलली, “चला , थांबलं एकदाचं. कच्चा माल संपला असावा. काहीही असो माझा प्रयोग तर यशस्वी झाला!

डॉक्टर, चुलीत नाहीतर बंबात घाला तुमचे प्रयोग. मला आधी हे सांगा की हा पॉप कॉर्नचा कचरा कोण साफ करणार आणि कसा साफ होणार ह्याचा विचार आधी करा.

चुलीत कोणते इंधन वापरायचे त्याचे प्रयोग मी यथावकाश करणार आहेच,” डॉक्टरांच्या पर्यंत माझा वैताग पोचलाच नव्हता. आणि ह्या चवदार पॉप कॉर्नचा आपणच फडशा उडवू.

ते पांढरेशुभ्र पॉप कॉर्न बघून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. इकडे डॉक्टरांना जोक सुचत होते. किंवा ते दृश्य पाहून त्यांचे डोके फिरले असावे. ह्यातून बाहेर पडायचे असेल तर मलाच काहीतरी करायला पाहिजे.

जे काही करायचे ते लवकर करायला पाहिजे होते. सगळीकडे बोंबाबोंब व्हायच्या आधीच. नाहीतर सगळी कॉलनी जमा झाली की दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरांत डॉक्टरांच्या आणि माझ्या नावाने हेडलाईन्स झळकायच्या!

मी डॉक्टरांच्या विश्वातून त्यांना हलवून जागे केले.

डॉक्टर, तुम्ही तुमचा प्रोग्राम उलटा केला तर? म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याच्या ऐवजी पक्क्यामालापासून कच्चा माल बनवला तर? पहा असे करता येईल काय. म्हणजे पॉप कॉर्नपासून तुमचे काय ते वायू इत्यादी बनतील. काय वाटते तुम्हाला?”

डॉक्टरांनी माझ्याकडे निरखून बघितले. मी काय बोलतो आहे हे त्याना समजले नसावे. मी त्यांना समजावण्यासाठी तोंड उघडणार तो ते म्हणाले.

चूप, चूप. मी विचार करतो आहे मला डिस्टर्ब करू नकोस.

डॉक्टरांनी खिशातून छोटा संगणक काढला आणि त्यांत लिहायला सुरवात केली. लिहून झाल्यावर बटण दाबून त्यांनी प्रोग्राम मशिनकडे पाठवला. आम्ही वाट बघत बसलो. आणि अहो आश्चर्यम्! महादाश्चर्यम्! मशीनने कामाला सुरवात केली. हळूहळू पॉप कॉर्नचा ढीग ओसरायला लागला. त्याची लेवल कमी कमी होऊ लागली. काही वेळातच आम्ही बंगल्यांत प्रवेश केला. मशीनने सगळे पॉप कॉर्न फस्त केले. आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या लहानश्या सजेशनने केव्हढा मोठा प्रॉब्लेम चुटकीसरसा सोडवला होता.

डॉक्टर भारावून गेले होते, “प्रभुदेसाई, तू महान शास्त्रज्ञ आहेस. तंदुरी चिकनपासून कोंबडी करण्याच्या प्रयोगांत मला कधी यश आले नाही. पण आज तू जे काय केले आहेस त्याला जगांत तोड नाही. माझे केव्हढे मोठे स्वप्न आज साकार झाले. तुझी आयडीया, माझा प्रोग्राम आणि हा रेप्लीकेटर! आपण आज न्यूटन, आईन्स्टाइनपेक्षाही महान शोध लावला आहे. विश्वाचा असा सिद्धांत आहे की विश्वाचा नेहमी व्यवस्थितपणाकडून गोंधळाकडे प्रवास चालला आहे. आज इतिहासांत प्रथमच त्याने उलटा प्रवास केला आहे. फ्रॉम डिसऑर्डर टू ऑर्डर!

डॉक्टर काय बोलले त्यांतले एक अक्षरही मला उमगले नाही. पण ते वेड्यासारखे नाचत होते त्यांत मीही सामील झालो.

जवळच कुठेतरी मल्टीप्लेक्स सिनेमागृहात एंड गेमपिक्चर भरात आला होता. प्रेक्षक पॉप कॉर्न खात खात पिक्चरची मजा लुटत होते. इतक्यांत सगळ्यांचे पॉप कॉर्न पाहता पाहता भुरकन् उडून गेले. अगदी नाहीसे झाले. एक कण ही शिल्लक राहिला नाही. राहुल आपल्या मित्राला म्हणाला, “बंटी माझे पॉप कॉर्न कुठे गेले? आता हा टब भरलेला होता. आता ह्यात एक कण नाही. तू तर घेतले नाहीस ना.
सिनेमागृहातल्या सगळ्यांचे पॉप कॉर्न गायब झाले होते. बाहेर पॉप कॉर्न विकणाऱ्याच्या शो-केस मधले पॉप कॉर्नही नाहीसे झाले होते. एकाच थेटर मध्ये नाही तर पुण्याच्या झाडून सर्व थेटरमधले पॉप कॉर्न नाहीसे झाले होते किंवा होत होते. केवळ पुण्यातच नाही तर भारतांत सगळीकडे. केवळ भारतांत नाहीतर जगांत सर्व ठिकाणी. नंतर मी ऐकले की मंगळावर, ग्यानिमिडवर आणि युरोपावर, जेथे जेथे मानवी वसाहती होत्या, जेथे जेथे पॉप कॉर्न संस्कृती पोचली होती तेथे तेथे पॉप कॉर्न नाहीसे होत होते!

ह्याचा सर्वात मोठा फटका सिनेमा उद्योगाला बसला. रसिक प्रेक्षकांना डोक्यांत एकदम प्रकाश पडला. आपण इतके दिवस पिक्चर बघायला जात होतो ते खर म्हणजे एसी मल्टीप्लेक्समध्ये पॉप कॉर्न एन्जॉय करायला जात होतो. पॉप कॉर्न नाहीत मग पिक्चर कशाशी खायचा? हे कटू सत्य लक्षांत येताच थिएटरं ओस पडू लागली. सरकारला पण त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी झाल्या प्रकारची जबाबदारी शत्रूराष्ट्रावर टाकली आणि खबरदारीचा उपाय म्हणून अठरा औक्षणी सैन्य सीमेवर धाडले. पण जेव्हा शत्रूराष्ट्राने देखील अशीच तक्रार युनोकडे केली तेव्हा ही एक आख्ख्या विश्वावर आलेली आपत्ती आहे ह्याची जाणीव सगळ्यांना झाली. शेवटी सगळ्यांच्या मते एकोणीसाव्या शतकातल्या श्री पी जे एल नेहरू नावाच्या एका इसमावर टाकण्यांत आली. त्या खुंटीवर आधीच कितीतरी लक्तरे वाळत टाकण्यांत आली होती त्यांत हे अजून एक! एवढे करून झाल्यावर अखेर अमेरिका ह्यावर काय उपाय शोधून काढते इकडे साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले.

मला आणि डॉक्टरांना ह्याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही दोघेही मजेत घरी झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी टीवी उघडला. मुख्य ब्रेकिंग न्यूज हीच होती. पॉप कॉर्नचे नाव ऐकताच मी दचकलोच. कालच झालेला पॉप कॉर्नचा कहर अजून माझ्या मनात ताजा होता. माझ्या डोक्यांत एकदम प्रकाश पडला. ओ हो म्हणजे मशीन काम करायचे थांबले नव्हते. ते आता विश्वातले सर्व पॉप कॉर्न फस्त करत होते. अरे बापरे ह्याचे तर पॉप कॉर्न मॉन्स्टर मध्ये रुपांतर झाले होते. डॉक्टर काय करायला गेले आणि काय झाले.

मी तडक उठलो नि डॉक्टरांच्या बंगल्यावर दाखल झालो. डॉक्टर व्यायाम करत होते. मला बोलण्याची संधी न देताच त्यांनी प्रवचन झाडायला सुरुवात केली,

प्रभुदेसाई, या सूर्यनमस्कारांत केवढी ताकद आहे ------

ते सर्व सोडून द्या हो. ह्या बातम्या पहा.मी त्यांना पेपरमधल्या ताज्या बातम्या दाखवल्या. डॉक्टरांनी त्या लक्षपूर्वक वाचल्या. युरोपा आणि ग्यानिमिडचे उल्लेख वाचून ते जरा चरकले असावेत असे मला वाटले.

ओ माय गॉड!त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, “आता आपल्यालाच हे निस्तारायला पाहिजे.

त्यांनी तत्काळ आपला संगणक खोलला. त्यांत ते काहीतरी बघत होते. ते बघितल्यावर त्यांनी कपाळावर हात मारला, “अगदी नवशिके प्रोग्रामर देखील करणार नाहीत अशी चूक मी केली. कित्येक पायऱ्यावरून पुन्हा पुन्हा फिरणाऱ्या ह्या प्रोग्रामला इंफायनीट लूप मधून बाहेर पडण्यासाठी वाटच ठेवली नाही. त्यामुळे हा सांगितलेले काम अथक अनंत काळापर्यंत मनोभावे करत राहिला. माय मिस्टेक! आता सुधारतो.
त्यानंतर आम्ही दोनही प्रोग्रामच्या ट्रायल घेतल्या. प्रथम थोडे पॉप कॉर्न बाहेर काढले. जेव्हढे मागितले तेव्हढे पॉप कॉर्न मशीनने बाहेर काढले आणि मशीन तात्काळ बंद झाले. आता ते मशीन काढलेले पॉप कॉर्न खात नव्हते. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. ताबडतोब डॉक्टरांनी चॅनेलवाल्यांना फोन करून सांगितले की मला अदृश्य होणाऱ्या पॉप कॉर्नवर इलाज सापडला आहे. मग काय विचारता चॅनेलवाल्यांची धावपळ उडाली.

मुलाखतीत मात्र डॉक्टरांनी चलाखी केली. त्यांनी सगळा दोष मानवजातीवर टाकला. मानवांनी अगणित पापे केल्यामुळे देवांनी शिक्षा म्हणून त्यांचे पॉप कॉर्न काढून घेतले. त्यांनी जर प्रमाणिकपणाने आपल्या पापांचा झाडा दिला, आणि देवांनी क्षमा करावी अशी प्रार्थना केली तर पॉप कॉर्न परत येतील.

कुठल्यातरी मल्टीप्लेक्समध्ये एंड गेमचे मध्यंतर झाले होते. पॉप कॉर्नच्या स्टालवर लोकांची गर्दी झाली होती. पॉप कॉर्नच्या स्टालवाल्याने देवाच्या फोटोला हार घातला आणि कान पकडून त्याने क्षमा याचना केली ,”देवा महाराजा, मी काल पर्यंत पन्नास रुपयांचे पॉप कॉर्न दोनशे रुपयांना विकून मोठे पाप करत होतो. क्षमा करा. आजपासून मी पन्नास रुपयांचे पॉप कॉर्न पन्नास रुपयांनाच विकेन. हा एकदम कट टू कट भाव आहे, माझ्यासाठी फक्त पाच रुपये सुटतात. तेव्हा देवा पॉप कॉर्न परत आणा.

एवढे बोलून त्याने मशीन चालू केले. धडा धडा पॉप कॉर्न बाहेर पडू लागले. सर्व प्रेक्षकांनी एकच आरोळी ठोकली, “आले,आले. पॉप कॉर्न परत आले!
(समाप्त)

 

 

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

काकडेच्या खुन्याची कथा.