टाईम मशीन.
अविनाश हार्डीकर! हा माझा जीवश्चकंठश्च मित्र. बालपणापासून. त्याच्या नावातही
जादू आहे. म्हणजे असं पहा. हार्डीकर! मधला हार्डीचा संबंध थेट केम्ब्रिजच्या गणिती
हार्डी शी तर हार्डीकर! मधला हार्दिक पांड्या तर तुम्हाला माहीत” असणारच. पण
हार्डीकर! मधली हार मात्र त्याने कधीही मानली नाही. कर म्हणजे करच असा त्याचा बाणा
होता. तो स्वतःचे नाव उद्गारवाचक चिन्हांसकट लिहित असे आणि दुसऱ्यानीही तसच लिहावे
असा त्याचा आग्रह असे. कुणी जर त्याला “अरे हार्डीकर” म्हणून ओरडूनही हाक मारली तर
ती त्याला ऐकू जात नसे, पण तेच जर कुणी त्याला मुंबईच्या कोलाहालात हळुवार “अरे
हार्डीकर!” असे संबोधले तर लगेच ऐकू
जाणार. असो.
हार्डीकर! लहानपणापासून नवीन नवीन उपकरणे बनवण्यात वेळ घालवणारा होता. त्याने
वयाच्या नवव्या वर्षी दहा काचांचे
शोभादर्शक बनविले होते. वयाच्या एक वर्ष पुढेच. आम्ही पण शोभादर्शक बनवले
होते पण ते फक्त तीन काचांचे. थ्री डायमेंशनल.
पुढे त्याने सिलीकाचा स्फटिक वापरून रेडीओ बनवला.
माझ्या समोर बॅटरीचे सेल लावून तो म्हणाला, “प्रभ्या, आता ऐक मुंबई अ स्टेशन
लागेल.”
रेडीओने खरखर करून घसा साफ केला आणि बोलू लागला.
“तहे आत देम्यात बाला ल्याप आरमाकू जनोम. हेआन्द्र्के औब मुन्चेनी वाश्का आहे.”
“कळ्ळं?”
“मला फक्त “आत” आणि “आहे” असे दोन मराठी शब्द कळलं.”
“अरे असा कसा रे नाठाळ तू? रेडीओ म्हणाला कि, ” हे आकाशवाणीचे मुंबई अ
केंद्र आहे. मनोज कुमार आपल्याला बातम्या देत आहेत.””
“हार्डीकर, तू महान
आहेस! मी काही तुझ्या इतका हुशार नाही हे मी खुले दिलसे मानता हू.”
“अरे तो उलट्या मराठीत बोलत होता. क्रिस्टल बहुतेक उलटा लागला आहे. म्हणजे
क्रिस्टलच्या निगेटिव टर्मिनलला बॅटरीचे पॉझिटीव कनेक्ट झाले असणार. आत्ता त्याला
ठीक करतो.”
त्याने बॅटरी काढून उलटी लावली. पण मुंबई अ ला काही सुधरेना.
“प्रभ्या, तू उद्या ये. तो पर्यंत मी काय कारतो, ह्याला माझ्या कॉम्प्युटरशी
जोडतो. एक छोटा प्रोग्राम लिहावा लागेल. जावा मध्ये. स्पीचझॅप.जावा. सिम्पल!”
म्हणजे आधी हार्डीकर!+ त्यात जावा++!
तीन + म्हणजे जरा जास्तच झाले नाही का?
त्या नंतर मी दोन महिने हार्डीकर!च्या घराच्या बाजूला फिरकलोच नाही.
त्याने घरच्या घरीच एकदा DIY TV बनवला तो पण असाच. त्यातही चित्र उलटे दिसायचे.
“हार्डीकर! मी सांगू का तू सेट उलटा ठेव म्हणजे आपल्याला चित्र सुलटे दिसेल.” मी
त्याला सुचवलं.
“ग्रेट आयडिया! मी आत्ता त्याला सीधा आय मीन उलटा करतो.”
त्याने TV उलटा करून लावला. पण काही उपयोग झाला नाही. चित्राने पलटी खाल्ली आणि
पुन्हा उलटे झाले.
“मित्रा हार्डीकर!, तू आता TV कॉम्प्युटरशी जोड आणि पायथनचा प्रोग्राम लिही.
पिक्सेल बाय पिक्सेल उलटा करायला. हाय काय अन नाय काय.”
पुढे काय झाले मला माहित नाय. कारण
त्यानंतर माझे लग्न झाले, एक मुलगा पण झाला. संसारात गुरफटून गेलो. “अरे संसार संसार...” असे झाले.
मी मित्र हार्डीकर!ला पार विसरून गेलो.
पण तो मात्र मला विसरला नव्हता.
एक दिवशी ऑफिसातून घरी पोहोचलो तर बायको म्हणाली की कुणातरी हार्डीकर नावाच्या
इसमाचा फोन आला होता. ह्या नंबरवर अर्जेंटली कॉल करायाला सांगितलं आहे. माझ्या काही लक्षात येईना. कुणाही
हार्डीकराचे मी देणे लागत नव्हतो किंवा अलीकडे कुणाशी रस्त्यात वाद घातला नव्हाता.
नाही कॉल केला तर उगीच रात्री झोप येणार नाही. त्या पेक्षा आत्ता फोन करून म्याटर
वेळच्या वेळी निपटून टाकावे असा विचार करून दिलेल्या नंबरवर फोन केला.
“हॅलो, मी प्रभाक...” मला मधेच तोडून सामनेवाला पार्टी बोलला, “अरे प्रभ्या, ओळखलस
का. तू कसला ओळखणार म्हणा. तू म्हणजे पहिल्यापासून एक नंबरी ढ.”
मी बाजूला बघितलं. चुकून हिनं ऐकलं तर नसेल ना. ती किचनमध्ये भांडी विसळत होती.
मी कॉशसली विचारलं, “आपण कोण बोलताहात?”
“आम्ही कोण म्हणोनी काय पुसशी. अरे मी हार्डीकर उवाचि बोलतोय. हार्डीकर विथ उद्गार
वाचक चिन्ह. उवाचि!”
आता माझ्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.
“ओ हर्डीकर!! कसा आहेस रे बाबा
तू? आज तुला आठवण झाली?”
“तू ताबडतोब इकडे ये. असशील तस्सा ये.”
आता त्याच्या आवाजाचा टोन बदलेला होता.
“आत्ता? हर्डीकर!, मी तुझ्या वाणी लकी संट्या नाहीये. लग्न झालय माझे, मला बायको
आहे... एक मुलगा आहे, त्याचा अब्यास करून घ्यायचा असतो, नाहीतर त्याची मिस मला
भाजलेल्या शेंगासारखी फोडून खाईल. आता बायको हातात पिशव्या आणि यादी ठेवेल आणि
हुकुम देईल “गो.“ मग मी दुडू दुडू गोइंग गोइंग गॉन. सोप्पं नसते ते. तुला काय
समजणार म्हणा...”
“हा हा. माहिती आहे. उगी उगी. ललू नग. चिमण्या बाळा. हे बघ मी जगाची डेस्टिनी
बदलणारा शोध लावला आहे. तू पैला होमो सेपिअन आहेस ज्याला मी डेमो देणार आहे. यू आर
द चोझन वन. उद्या माझा आणि माझ्या बरोबर तुझा फोटो...”
“हे बघ कोड्यात बोलू नकोस. माझा बहुमोल वेळ वाया घालवू नकोस. काय लफडा केला आहेस?
सांग. पोलीस केस झाली आहे का.”
“नाही. फोनवर सांगणार नाही. फोनला कान असतात. प्लीज आपल्या मैत्रीखातीर तू ताबडतोब
इकडे ये.”
प्रकरण सिरिअस आहे हे मला कळले.
“आलोच. अजून तिथेच राहतोयस ना?”
“हो हो. तिथेच माझी लॅब आहे.”
“आलोच बघ.” एव्हढे बोलून मी फोन बंद केला.
मग बायकोकडे गेलो. चेहरा पाडून तिला म्हणालो,
“पुष्पा, मला जायला पाहिजे. माझा मित्र खूप सिरिअस आहे.”
“अस्स?”, ती छद्मीपणे म्हणाली, “त्याला कोणी माय-बाप, भाऊ-बहिण, बायका-मुले, इष्ट
आप्त-मित्र नाहीत काय? तुम्हीच भेटलात बरे,”
मी चेहरा अजून पाडला.
“बहुतेक अटॅक आहे. आता मला बोलावले आहे तर मी काय करू?”
“का कुणास ठाऊक मला असं वाटतंय कि तुम्ही मला फसवता आहात. जायचय तर जा पण लवकर परत या.”
पडत्या फळाची आज्ञा मानून मी जायला वळालो.
“अहो, इथं काय पडलय ते उचला.”
मला वाटलं फळ असेल पण नाही माझा पडलेला चेहरा होता. तो गोळा करून मी निघालो.
हर्डीकर! त्याच्या घर-कम-लॅब मध्ये
अस्वस्थपाने येरझारा घालत होता.
“तुझीच वाट बघत होतो बघ.”
“काय प्रॉबलेम काय झाला आहे.” मला त्याची खूप काळजी वाटत होती.
तो हसायला लागला.
मी बायकोला थापा मारून इकडे आलो आणि हा पठ्ठ्या आपला खुशाल हसतोय.
“सांगतो. अरे हा आपला MTNLचा टेलेफोन आहे ना त्याने आपण परग्रहवासीयांशी संपर्क
साधू शकतो.” इतके बोलून तो हसायला लागला. मलाही हसू यायला लागले.
“ह्या ह्या ह्या ह्या ह्या...”
“ह्या ह्या ह्या ह्या ह्या...”
तो हसायचा थांबला आणि मला म्हणाला, “ मी हसतो ते ठीक आहे पण तू का हसतोयस?”
“सांगतो. अरे ह्या फोनने मला शेजारच्या गल्लीतल्या सोमाजी गोमाजीला कॉंटॅक्ट
करताना फेफे उडते. आणि तू एलीअन्सना कॉंटॅक्ट करण्याच्या बाता करतोयस. म हसू नको
तर काय करू. ह्या ह्या ह्या ह्या ह्या.”
“प्रभ्या, हसू नकोस.
मी सिरिअस आहे. यू टू बी सिरिअस.” असे
म्हणून तो पुन्हा हसायला लागला. “ह्या ह्या ह्या ह्या ह्या.”
अशी आमची हास्य जत्रा बराच
वेळ चालली.
“ऐक. तू पण परग्रहवासीयांशी संपर्क साधू शकतोस. काय करायचे सांगतो. एक नंबर एक
वेळा दाबायचा, दोन दोनदा, तीन तीनदा, असे करत नऊ नऊदा आणि शून्य शून्यदा
दाबायचे...”
“शून्य शून्यदा दाबायचे...” आता मी गडबडा लोळायला लागलो, “पण आपण त्यांच्याशी
बोलणार कसे, म्हणजे त्यांची भाषा आपल्याला येत नाही आणि आपली त्याना...” मी शंका
काढली.
“एलिअन्सना मराठी येते. त्यांनी “बोला मराठी चोवीस तासात खाड् खाड्” हे पुस्तक
घेऊन त्याचा अभ्यास केला. बोल आहेस कुठे.”
आता माझी छाती, बरगड्या, पोट हसून हसून दुखायला लागले.
स्वतःला सावरून मी त्याला म्हणालो, “बर तू मला कशासाठी बोलावले आहेस ते तरी सांग.”
“सांगतो, तो एलिअन मला म्हणतो कसा कि तुम्ही मानव अगदी हे आहात. अजून तुम्हा
लोकांना टाईम मशीन बनवता आले नाहीये. त्याने मला “तूच बन तुझ्या टाईम मशीनचा शिल्पकार “ हे पुस्तक वाचायला
दिले. ते वाचून मी टाईम मशीन बनवले आहे...”
“हार्डीकर विथ उद्गारवाचक चिन्ह. यू रास्कला. हेल विथ यू. मी जातो घरी. तू दुसऱ्या
कोणालातरी पकड. आणि ऐकव त्याला तुझ्या लोणकढ्या. GOOD NIGHT.विथ आल letters
कॅपीटल्स.”
“जरा थांब रे. आलास आहेस तर डेमो बघून जा.”
त्याने माझ्या दंडाला धरून हॉलला लागून असलेल्या खोलीत नेले.
“हे बघ माझे टाईम मशीन.” त्याने गर्वाने एका पेटीकडे बोट दाखवले.
ते बघून मला पुन्हा हास्याचा उमाळा आला. हसेन नाहीतर काय? ते एक टाईपरायटर सारखे काहीतरी होते आणि त्याला
दोन तीन डायल जोडल्या होत्या. हे म्हणे टाईम मशीन.
हार्डीकर (विथ उद्गारवाचक चिन्ह) मला काही तरी जार्गन ऐकवायला लागला. Delayed
Action Algo, स्पेस टाईम फॅब्रिक, त्यात आपले स्थान... मी त्याला थांबवले.
“मित्रा, हे मशीन वापरण्याआधी त्याची थिअरी समजणे जरुरी आहे का? नाही ना? मग स्किप
कर आणि पुढे चल.” मी त्याला कठोर शब्दात ऐकवले.
“ठीक आहे. जशी तुझी मर्जी.”
त्याने मशीन चालू केले आणि टाईपरायटरच्या किया बडवल्या.
“आता गंमत बघ. आपण थोडा भूतकाळात प्रवेश करणार आहोत. तयार रहा.”
मी “गंमत” बघायला तयार झालो.
आम्ही दोन खुर्च्यांवर बसून हॉलमध्ये काय चालले आहे ते बघत होतो.
“कोणतरी अस्वस्थपाने येरझारा घालत आहे.”
“प्रभ्या, अरे तो “मी”च आहे तुझी वाट बघतो आहे.”
“अरे मी आणि तू तर इथे आहोत. कोण कुणाची वाट बघतोय?”
मग “मी”ने हॉलमध्ये प्रवेश केला. मी स्वतःला चिमटा काढून खात्री करून घेतली आणि
अनिमिष नेत्रांनी समोरचे दृश्य बघत बसलो.
“हार्डीकर हे टाईम मशीन नाहीये. ह्याला कोकणात आम्ही भुताटकी म्हणतो. तू कुठल्या
तरी भुताला वश करून घेऊन हे त्राटक करतो
आहेस. हे बरे नव्हे. खरं तर हे डेंजरस आहे. हे उलटले तर.” मी इतका अपसेट झालो होतो
कि हार्डीकरला उवाचि लावायचं विसरून गेलो.
“होय. टाईम नावाच्या भुताला मी वश केले आहे. तू उगाच बोंब मारून भूतकाळ डिस्टर्ब
करू नकोस. तसं झालं तर आपण दुसऱ्या विश्वात ढकलले जाऊ. त्या पेक्षा चुपचाप बघ आणि
ऐक. प्रभ्या-१ आणि हार्डीकर-१ काय बोलताहेत ते ऐक.
“सांगतो. अरे हा आपला MTNLचा टेलेफोन आहे ना त्याने आपण परग्रहवासीयांशी संपर्क
साधू शकतो.” इतके बोलून हार्डीकर-१ हसायला
लागला. मी-१लाही हसू यायला लागले.
“ह्या ह्या ह्या ह्या ह्या...”
“ह्या ह्या ह्या ह्या ह्या...”
हार्डीकर-१ हसायचा थांबला आणि मी-१ला
म्हणाला, “ मी हसतो ते ठीक आहे पण तू का हसतोयस?”
“सांगतो. अरे ह्या फोनने मला शेजारच्या गल्लीतल्या सोमाजी गोमाजीला कॉंटॅक्ट
करताना फेफे उडते. आणि तू एलीअन्सना कॉंटॅक्ट करण्याच्या बाता करतोयस. म हसू नको
तर काय करू. ह्या ह्या ह्या ह्या ह्या.”
“प्रभ्या, हसू नकोस.
मी सिरिअस आहे. यू टू बी सिरिअस.” असे
म्हणून तो पुन्हा हसायला लागला. “ह्या ह्या ह्या ह्या ह्या.”
अशी हास्य जत्रा बराच वेळ
चालली.
“ऐक. तू पण परग्रहवासीयांशी संपर्क साधू शकतोस. काय करायचे सांगतो. एक नंबर एक
वेळा दाबायचा, दोन दोनदा, तीन तीनदा, असे करत नऊ नऊदा आणि शून्य शून्यदा
दाबायचे...”
“शून्य शून्यदा दाबायचे...” आता मी-१
गडबडा लोळायला लागला, “पण आपण त्यांच्याशी बोलणार कसे, म्हणजे त्यांची भाषा
आपल्याला येत नाही आणि आपली त्याना...” मी-१ने
शंका काढली.
“एलिअन्सना मराठी येते. त्यांनी “बोला मराठी चोवीस तासात खाड् खाड्” हे पुस्तक
घेऊन त्याचा अभ्यास केला. बोल आहेस कुठे.”.
मी-१ हार्डीकर-१ला म्हणाला, “बर तू मला कशासाठी बोलावले आहेस ते तरी सांग.”
“सांगतो, तो एलिअन मला म्हणतो कसा कि तुम्ही मानव अगदी हे आहात. अजून तुम्हा
लोकांना टाईम मशीन बनवता आले नाहीये. त्याने मला “तूच बन तुझ्या टाईम मशीनचा शिल्पकार “ हे पुस्तक वाचायला
दिले. ते वाचून मी टाईम मशीन बनवले आहे...”
“हार्डीकर विथ उद्गारवाचक चिन्ह. यू रास्कला. हेल विथ यू. मी जातो घरी. तू दुसऱ्या
कोणालातरी पकड. आणि ऐकव त्याला तुझ्या लोणकढ्या. GOOD NIGHT.विथ आल letters
कॅपीटल्स.”
“जरा थांब रे. आलास आहेस तर डेमो बघून जा.”
हार्डीकर-१ने मी-१च्या दंडाला धरून हॉलला
लागून असलेल्या खोलीत नेले.
“हे बघ माझे टाईम मशीन.” त्याने गर्वाने एका पेटीकडे बोट दाखवले.
ते बघून मी-१ला पुन्हा हास्याचा उमाळा आला. हार्डीकर-१ने मी-१ला टाईम मशीनची थिअरी
सांगायला लागला.
Action Algo, स्पेस टाईम फॅब्रिक, त्यात आपले स्थान... मी-१ने त्याला थांबवले.
“मित्रा, हे मशीन वापरण्याआधी त्याची थिअरी समजणे जरुरी आहे का? नाही ना? मग स्किप
कर आणि पुढे चल.” मी-१ने त्याला कठोर
शब्दात ऐकवले.
“ठीक आहे. जशी तुझी मर्जी.”
हार्डीकर-१ने मशीन चालू केले आणि टाईपरायटरच्या किया बडवल्या.
“आता गंमत बघ. आपण थोडा भूतकाळात प्रवेश करणार आहोत. तयार रहा.”
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
“प्रभ्या, हे “आवर्तन १” झाले. मी-१ने मशीन चालू केले आहे. आपण आता आवर्तन २ मध्ये
प्रवेश करणार आहोत.” (इथे मी-१ म्हणजे हार्डीकर!) ने मला सजग केले.
“हार्डीकर-२ आणि मी-२ आता येतील.”
मी टोटली कन्फ्युज झालो होतो. भारून गेलो होतो. शेजारी हार्डीकर-१ आणि मी-१ बसले
होते. त्याना आमच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. त्या दोघांना बघून माझ्या डोक्यात
नाही नाही ते विचार येऊ लागले.
मी कोण आहे? हा माझ्या शेजारी बसलेला मी-१ आहे तो कोण आहे? आम्हा दोघांपैकी खरा कोण आहे?
हार्डीकर-२ वाट बघत होता त्या मी-२ ने
हॉलमध्ये प्रवेश केला.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
१७६० आवर्तने झाली होती. किती वेळ झाला होता देवालाच माहित.
मी आणि हार्डीकर. आम्ही दोघेही जणू
पॅरलाइज़्ड झालो होतो. आमच्या दाढ्या आणि डोईचे केस चांगले चार चार इंच वाढले होते.
“हार्डीकर उवाचि, आपण टाईम लूप मध्ये फसलो आहोत. बस झाली गंमत. आपण आता
ह्याच्यातून बाहेर कसे पडायचे ते सांग. एक्झिट बटन दाब.”
“प्रभ्या, हे असे होईल ह्याची मला कल्पना नव्हरी. ह्याच्यातून बाहेर कसे पडायचे?
मला माहित नाही. सॉरी.”
“काय बोलतो आहेस तू! यू मीन टू से आपण ह्या लूपमधेच जगायचं? ओ नो!”
“प्रभ्या निदान तुझे लग्न तरी झाले आहे. माझे ते पण नाही रे.”असं बोलून त्याने
विव्हळायला सुरवात केली.
“विव्हळू नकोस. व्हेन इन ट्रबल, फोन ए फ्रेंड, तू त्या तुझ्या एलिअन मित्राला फोन
कर आणि विचार की काय करू.”
हार्डीकर उवाचिने ते कोड डायल केले.
“प्रभ्या, कुणी एलिअन युवति लाईनवर आली आहे.”
मी त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला.
“हॅलू,” मी गोड आवाजात कूSSS केले. “एलिअन भाऊ आहेत का? त्यांच्याशी बोलायचे होते.
अर्जंट आहे म्हणाव.”
“अर्जंट आहे का?” ती गोड आवाजात(अहाहा) बोलत होती, “मी असं करते, त्यांनाच तुमच्या
कडे पाठवते.”
“चालेल. ते बेस होईल. थँक यू.”
फोन बंद केला.
“एलिअन स्वतःच इकडे येत आहे.” मी
हार्डीकर!ला सांगितले.
थोड्या वेळात पांढरा शुभ्र लॅब कोट परिधान केलेला एलिअन हॉलमध्ये आला. त्याच्या बरोबर ती गोड एलीआना पण
आली.
“काय प्रभाकर, आज पुन्हा लूपमध्ये गेलास? मी काय सांगितलं होतं? रोज सकाळी पिवळी गोळी घ्यायची म्हणून सांगितले
होतं ना मी. मग आज घेतली होतीस? नर्सबाई ह्याला ती पिवळी गोळी द्या पाहू ताबडतोब. काळजी करू नकोस, छान झोप
काढ. बरं वाटेल.
लूपमधून बाहेर पडशील.”
तर मी सध्या पिवळी गोळी खाऊन झोपी गेलो आहे. “जागा” झालो तर अजून गोष्टी सांगेन.
(समाप्त)
Comments
Post a Comment