Carnival Of Souls

 कार्निवाल ऑफ सोल्स

कार्निवाल ऑफ सोल्स हा एक विचित्र, अविस्मरणीय आणि विशेष म्हणजे अत्यंत कमी खर्चात बनवलेला भीती चित्रपट आहे. ही चर्चमध्ये ऑर्गन वाजवणाऱ्या एका स्त्रीची करूण कहाणी आहे. (चित्रपटात नायक नाहीये. ह्या नायिकेच्याच भोवती हा चित्रपट बेतला आहे.) तिला एका अमानवी चेहेऱ्याने पछाडले आहे. नायिका नुकतीच एका जीवघेण्या अपघातातून वाचली आहे. मरणारच होती पण वाचली. मोटारगाडीतून मैत्रीणींबरोबर  प्रवास करताना तिची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत पडते. हा ह्या चित्रपटातील सुरवातीचा सीन आहे.
सुरवात बघताना प्रेक्षकाला अशी भावना वाटते कि ह्या प्रिंटमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण मधूनच सिनेमा बघत आहोत. चित्रपटगृहात उशिरा पोचल्यावर सिनेमा बघताना जसे वाटत असेल तसं काहीसं फीलिंग येते.
सिनेमाची कथा जितकी विचित्र आहे तितकाच त्याचा इतिहास. चित्रपट नवख्या हौशी लोकांनी बनवला आहे ह्याची वारंवार जाणीव करून देणारा आहे.
कृत्रिम अभिनय, ओठांची हालचाल आणि संभाषण ह्यातील तफावत, आडमुठे संपादन, कंटीन्यूटी मधल्या चुका. चित्रपटाची नायिका हीच कायती एकमेव प्रोफेशनल नटी आहे. काही समिक्षकांच्या मते ह्या असल्या चुकांमुळेच चित्रपट “गहिरा” झाला आहे.
तर नायिका तिच्या दोन मैत्रिणींसह गाडीतून प्रवास करत असताना दोन खट्याळ फाजील तरुण त्यांना  शर्यतीसाठी उद्युक्त करतात. त्यांची शर्यत सुरु होते. ह्या रेसचा दोनी गाडीतील मंडळी आनंद घेत असतात. बघता बघता ह्या दोनी गाड्या नदीवरच्या लाकडी अरुंद पुलावर पोचतात, इथे एका गाडीचा दुसऱ्या गाडीला धक्का लागतो आणि तरुणींची गाडी पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळते. धावाधाव होते, गावकरी मदतीला धावतात, गावचा शेरीफ हजार होतो. आणि बुडालेल्या गाडीला बाहेर काढायचे प्रयत्न करू लागतात. तेव्हढ्यात नदीतल्या वाळूच्या उंचवट्यावर तीन तरुणींपैकी एक –नायिका- चिखलपाण्यातून बाहेर पडते. सगळे लोक तिच्याकडे धाव घेतात. तिचा हात धरून तिला वर आणतात. ती अर्धवट शुद्धीवर आहे. लोक तिला विचारतात, कि तुझ्या मैत्रिणींचे काय झाले. माहित नाही असे जुजबी उत्तर ती देते.
पहा डायरेक्टर टाईमपास न करता सिनेमा सुरु झाल्यावर पाच मिनिटात मुद्द्यावर आला आहे. हे मला फार आवडले. एकूण सिनेमाची लांबी केवळ नव्वद मिनिटेच आहे!
हे दृश्य बघून तुम्हाला अनेक प्रश्न पडतील. त्यातील काहीची उत्तरे यथावकाश मिळतील. काहींची मिळणार नाहीयेत. ती तुमची तुम्हीच  शोधायची आहेत.

आपण स्टोरी सायडिंगला टाकू. आणि हा सिनेमा जसा घडला त्याची विचित्र कथा पाहू.
फिल्मचा डायरेक्टर आहे
Harold (Herk) Harvey. सेंट्रॉन कॉर्पोरेशन नावाच्या कंपनीत हा कामाला होता. ही कंपनी औद्योगिक  प्राधिकरणांसाठी लहानसहान फिल्म बनवत असे. म्हणजे तुम्ही जर आईसक्रीम पार्लर गेला असाल तर “आमचे आईसक्रीम कसे निर्जंतुक वातावरणात बनवले जातात”,  किंवा “हे पहा आमचा इडली डोसा लोक कसे आनंदाने मिटक्या मारत खात आहेत” असे विडीओ नॉन स्टॉप चालू असतात. इत्यादी. १९६० सालपर्यंत  त्याने असे जवळपास २०० विडीओ बनवले असतील. ह्या असल्या कामाचा त्याला वीट आला होता. त्याच्या मनात एखादी फीचर फिल्म बनवावी असे विचार घोळत होते. त्याने ऑफिसमधून रजा घेतली. आणि सिनेमा कसा बनवायचा ह्याचा विचार करू लागला. योगा योगाने यूटॉ (Utah) प्रांतातून प्रवास करत असताना ग्रेट सॉल्ट लेकच्या जवळ कधी काळी बांधलेला पण आत्ता (म्हणजे १९६१ साली) भग्नावशेष झालेला रीझॉर्ट त्याच्या दृष्टीस पडला. ह्या वास्तूलाही इतिहास होता. १९२० बांधला तेव्हा हा सॉल्ट वॉटर बाथ साठी प्रसिद्ध होता. पण नंतर ग्रेट सॉल्ट लेकचा किनारा रीझॉर्टपासून दूर गेला. मग ह्याची पुनररचना करून ह्याचे सॉल्टएअर अम्युसमेंट पार्क मध्ये रुपांतर करण्यात आले. हळू हळू लोकांच्या आवडी निवडी बदलत गेल्या. अखेरीस ही पार्क बंद करण्य्यात आली. पण ह्या वास्तूने हार्वेला झपाटले, त्यच्यावर गारुड केले.

१९८९ मध्ये हार्वेएका मुलाखतीत बोलताना सांगतोय,
"सूर्यास्त झाला होता आणि मी कॅलिफोर्नियाहून कॅन्सासला जात होतो तेव्हा मी पहिल्यांदा सॉल्टएअर पाहिले. ग्रेट सॉल्ट लेकमध्ये जाण्यासाठी अर्ध्या मैलाच्या कॉजवेच्या टोकाला असलेले हे एक मनोरंजन पार्क आहे. तलाव ओसरला होता आणि त्याचे मूरिश बुरुज असलेले अम्युसमेंट पॅवेलीअन लाल आकाशासमोर उभे होते. मला वाटले की मी एका वेगळ्या काळात आणि परिमाणात गेलो आहे. मी जे पाहत होतो त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी गाडी थांबवली आणि अम्युसमेंट पॅवेलीअनकडे  निघालो. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले. मिठाच्या समुद्रकिनाऱ्याचा पांढरा रंग आणि निर्जन इमारतींची विचित्र गडद शांतता यामुळे मी पाहिलेले ते सर्वात भयानक ठिकाण होते."   
हार्वे ताबडतोब कान्सासला परतला आणि त्याने आपला मित्र जॉन क्लीफर्डला गाठले. हा त्याच्या बरोबर
सेंट्रॉनमध्ये काम करत होता. हार्वेने त्याला सर्व किस्सा कथन केला. आपल्या आगामी चित्रपटासाठी कथा लिहिण्याची विनंती त्याला केली. अट फक्त एव्हढीच होती की सिनेमात शेवटी शेवटी त्या पॅवेलीअनमध्ये प्रेतात्मे नाच करत आहेत असे एक दृश्य असायला पाहिजे. बाकी ही वाज फ्री.
क्लीफर्डने तीन आठवड्यात कथा लिहून काढली.
हार्वेने सिनेमासाठी पैसे जमवायला सुरवात केली. सिनेमाचे मुलाचे बजेट
US $17.000 होते. हार्वेने स्वतःच्या हिमतीवर मित्रांकडून कर्ज काढून अजून १३००० डॉलर्सची जमवा जमव केली. दोनी मिळून ३०००० डॉलर्स जमले.
कल्पना करा कि हे ३०००० डॉलर्स घेऊन ये दो दिवाने पिक्चर काढायला निघाले. फक्त ३०००० डॉलर्स!
तीन आठवड्यात सहा सहकाऱ्यांच्या मदतीने हार्वेने ह्या फिल्मचे चित्रीकरण संपवले. त्यातला एक आठवडा
पॅवेलीअनमधल्या शूटिंगमध्ये  गेला. जिथे कार रेस होऊन  गाडी नदीत कोसळते त्या पुलाचे नाव काव पूल आणि तो  आहे सॉल्ट लेक सिटी जवळ Eudora मध्ये.
आता थोडी गंमत.
अपघाताच्या चित्रीकरणाच्या वेळी झालेले नुकसान भरून देण्यासाठी हार्वेचा १७ डॉलर्स खर्च झाला.
एका अपरीचीत इसमाला गल्लीतून गाडी चालवण्यासाठी २५ डॉलर्स द्यावे लागले.
तसेच सिनेमात नायिका एका दुकानातल्या ड्रेसिंग रूम मध्ये कपड्यांची ट्रायल घेते. ते दृश्य चित्रित करायला परवानगी द्यावी  म्हणून तिथल्या मॅनेजरला २५ डॉलर्स लाच.
पॅवेलीअनच्या वापरासाठी ५० डॉलर्सचे भाडे.
पॅवेलीअनच्या डान्स रूम मधले दिवे लावण्यासाठी हार्वेने पूर्वी तिथेच काम करणाऱ्या इलेक्ट्रिशिअचा शोध घेतला  आणि त्याच्याकडून डान्स रूममध्ये दिवे ऑन करून घेतले. 
भुतांचा नाच करणाऱ्या एकस्ट्रांसाठी  जवळच्या शहरातील डान्स क्लास मधल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली.
सिनेमात एका कामुक तरुणाचे काम, कन्सास विश्वविद्यालयात अभिनयाचे धडे घेणाऱ्या होतकरू अभिनेत्याने केले आहे.
आणि कळस म्हणजे नायिकेला पछाडणाऱ्या झोंबीचे काम दस्तुरखुद्द हार्वेनेच केले आहे. चला, तेव्हढीच पैशांची बचत!
अशा सिनेमात ट्रिक असतात पण हार्वेने एकाही ट्रिकसीन चा वापर केला नाही.
अशी सगळी काटछाट करून बनवलेला हा सिनेमा हॉरर चित्रपटांचा कल्ट मूवी झाला. 
आता थोडे नायिकेचे काम करणाऱ्या अभिनेत्री बद्दल. तिचे सिनेमातले नाव आहे मेरी हेन्री. तिची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे
Candace Hilligoss.  ह्या सगळ्या सेट-अपमध्ये  हीच एकटी प्रो अभिनेत्री होती. प्रो म्हणजे तिच्याकडे अभिनयाची पदवी होती. ह्या सर्व गुण संपन्न सुंदर अभिनेत्रीने माइंड ब्लोईंग कमाल अभिनय केला आहे.
आता कथेची सायाडिंगला टाकलेल्या स्टोरी लाईनला परत लाईनवर आणू.
अपघातातून वाचलेल्या, नदीच्या चिखलातून बाहेर पडणाऱ्या मेरीला बघून प्रेक्षकांना धक्का बसतो. अरे ही कशी वाचली? एनीवे, मेरी पुन्हा एकदा ऑर्गनच्या क्लासमध्ये दाखल होते. तिला दूरच्या एका खेड्यातल्या चर्चमध्ये ऑर्गन वादकाचे काम मिळते.  ती निव्वळ जगण्यासाठी म्हणून ते काम स्वीकारते. तिला आता ऑर्गनमध्ये किंबहुधा कशातही रुची उरलेली नाही.  ती नोकरीसाठी निघते तेव्हा तिचे गुरुजी चार उपदेशाचे शब्द सांगतात. वाद्य वाजवण्यासाठी बुद्धिमत्तेची जेव्हढी गरज आहे तेव्हढीच आत्मीयतेची गरज आहे. त्यामध्ये हृदय ओतायला लागते. शेवटी तिला निरोप देताना ते सांगतात कि कधी वेळ काढून इकडे येत जा. नायिका गुरुजींना तोडून उत्तर देते कि आता पुन्हा इथे येणे नाही.
कुछ समझे आप?
रात्रीच्या वेळी सुनशान हायवे वरून गाडी चालवताना तिला कारच्या खिडकीबाहेर तो “चेहरा” दिसतो. नंतर तर तो “माणूस” तिच्या गाडीसमोर उभा रहातो. भीतीने तिचा गाडीवरचा ताबा सुटतो. गाडी रस्ता सोडून खाली उतरते. सुदैवाने तेव्हाद्यावरच ते निभावते. पण मी पुढे लिहिणार नाहीये. कारण ते स्पॉईलर होईल. त्यापेक्षा असे कराना की तुम्ही हा पिक्चर स्वतः पहा. मग दुसऱ्या भागात मी जी चर्चा करणार आहे ती तुम्हाला जास्त अप्रिशिएट होईल.
हा पिक्चर यूट्यूब आपण बघू शकाल. हा मूळचा कृष्ण धवल  सिनेमा आहे पण आता ह्याची  रंगीत प्रत आली आहे. ज्यांना रंग भावतात त्यांच्यासाठी
https://www.youtube.com/watch?v=ay20EjDy_cE
पण माझ्या साराख्यांना असे चित्रपट
कृष्ण धवल मधेच आवडतात. तो तुम्ही इथे बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=n12ftkgNLX0
एन्जॉय!
तवर मी पुढचा भाग लिहिण्याचा प्रयत्न करतो.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

अरे हा एक गोष्ट सांगायची राहून गेली. नायिकेची भूमिका –मेरीची- करणाऱ्या Candace Hilligoss ह्या अभिनेत्रीला  ह्या भूमिकेसाठी मेहेनताना म्हणून २००० डॉलर्स फी देण्यात आली. त्या फी वर ती प्रचंड खुश झाली. तिचा नवरा हॉटेलमधे वेटरचे काम करत होता. त्याने तत्काळ नोकरी सोडून दिली. त्याला अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. त्याला लगेच ब्रॉडवे वर संधी पण मिळाली.
हार्वेने चित्रपट पूर्ण तर केला. हार्वेसाठी हा तसा सोप्पा भाग होता. पण आता वितरकाला पकडायचे होते. अश्या “बी-ग्रेड” सिनेमा वितरणाची जबाबदारी कोण घेणार? अखेर तोही मिळाला. हर्ट्झ-लायन नावाच्या कंपनीने ही जबाबदारी अंगावर घेतली. हा सिनेमा चालेल ह्याची त्याना खात्री नसावी. म्हणून त्यांनी हार्वेला न्यूड सीन्स टाकायची विनंती केली. हार्वेने असे काही करायचे नाकारले.
चित्रपटाचे सर्व हक्क वितरण कंपनीकडे गेले. त्या बदल्यात डायरेक्टर आणि लेखक ह्याना काय मिळाले. आधी त्यांना कवडीही मिळाली नाही. पण सिनेमाच्या नफ्याचा काही हिस्सा त्यांना मिळणार होता असा करार होता. डायरेक्टर हार्वेची हौस पुरी झाली होती. तो समाधानाने आपल्या जुन्या कंपनीत परतला.
तेव्हाच्या ड्राईव-इन थिएटरमध्ये एका तिकिटात दोन चित्रपट दाखवायची पद्धत होती. त्या प्रमाणे “कार्निवाल ऑफ सोल्स” हा चित्रपट “डेविल्स मेसेंजर” नावाच्या चित्रपटाच्या जोडीने दाखवला जाऊ लागला. “कार्निवाल ऑफ सोल्स”  चित्रपटाची लांबी थोडी जास्त होती म्हणून हर्ट्झ-लायन वितरकांनी हार्वेशी सल्ला मसलत न करताच सिनेमात वाटेल तशी काटछाट केली. हे समजताच हार्वेने तक्रार केली. पण तो काही करू शकला नाही, कारण चित्रपटाचे सर्व हक्क हर्ट्झ-लायनकडे होते. नंतर त्याने आपल्या हक्काच्या पैशाची मागणी केली. हर्ट्झ-लायन ने त्याला एक चेक पाठवून दिला. पण हर्ट्झ-लायनच्या खात्यात पैसे नसल्याने तो चेक बाउंस झाला.
सुदैवाने १९६४ साली हर्ट्झ-लायनचे दिवाळे वाजले. थोड्या कोर्ट कचेरी नंतर हार्वेला “कार्निवाल ऑफ सोल्स”चे  हक्क परत मिळाले. त्यानंतर हा सिनेमा अमेरिकेत टीवी वर दाखवायला सुरवात झाली. अजूनही ह्याला बी-ग्रेडचा शिक्का होता.  त्यामुळे रात्री उशिरा दाखवला जात होता. पण ह्या सिनेमाने रसिकांच्या मनाची पकड घेतली. ह्या चित्रपटाची मोहिनी अशी होती की एकदा बघितला कि प्रेक्षक कायमचा फॅन होतो.
जाणकार रसिक असे म्हणतात की जॉर्ज ए रोमेरोचा “नाईट ऑफ द लिविंग डेड”. डेव्हिड लिंचच्या “लॉस्ट हायवे” मधला “मिस्टरी मॅन”, नाईट श्यामलनचा “द सिक्स्थ सेन्स” ह्या सिनेमांवर “कार्निवाल ऑफ सोल्स”ची  छाप आहे.
हा सिनेमा प्रेक्षकांना का एव्हढा आवडला असावा?
एक तर सिनेमाचा विषय, सुपरनॅचरल एलेमेंटला सामान्य लोकांमध्ये आणून ठेवणे. अगदी कमी शब्दात भीती अधोरेखित करणे, उत्कृष्ट छायाचित्रण, साधे सरळ संवाद आणि नायिकेच्या भूमिकेत
Candace Hilligossचा  जबरदस्त अभिनय.

Carnival of Souls is very much a case of "less is more."

Carnival Of Souls: The Strange Story Behind the Greatest Horror Movie You’ve Never Seen

Happily, Harvey lived long enough to see his film enjoy success as a theatrical re-release in 1990
ह्या आधी “ट्वायलाईट झोन” मालिकेत “हिच हायकर” नावाचा एपिसोड झाला होता. गाडी चालवताना एका तरुणीला एक माणूस सारखा दिसत असतो. गाडीचा वेग कितीही कमी जास्त केला तरी तो सारखा नजरेसमोर येत रहातो. खर तर ती तरुणी प्रवासाला निघायच्या आधीच मृत झालेली असते. आणि म्हणूनच डेथ तिचा पाठलाग करत असतो. प्रेक्षकांना जाणीव होते कि काहीतरी विपरीत घडले आहे किंवा घडणार आहे. “कार्निवाल ऑफ सोल्स” मध्ये तो चेहरा सारखा येत रहातो आणि आपल्या मनातही हेच विचार येत रहातात.
मेरीही जीवघेण्या अपघातातून वाचून जिवंत बाहेर आलेली आहे. (खरच वाचली आहे का ती?)
पण मृत्यूला ते मान्य नाही. तो तिला पुन्हा आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मेरीचा एक पाय ह्या जगात आहे तर दुसरा पाय नेदरवर्ल्ड(netherworld) मध्ये आहे? हे या सिनेमात चांगल्या तऱ्हेने साकार केले आहे.
एकदम लहरी उमटतात आणि नायिका दुसऱ्या जगात प्रवेश करते. तिला लोक काय बोलत आहेत हे ऐकू येत नाही. तर ती कुणाला दिसत नाहीये वा तिचे बोलणे इतरांना ऐकू जात नाही. तिचा ह्या जगाशी संपर्क तुटला आहे. ही थरकाप उडवणारी दृश्ये आहेत.
ह्या चित्रपटाच्या यशात  पाईप ऑर्गनच्या संगीताचा  मोठा हिस्सा आहे. तिच्या कार मधल्या रेडीओ मध्ये कुठल्याही स्टेशन वर ऑर्गनच्या संगीताचे सूर वाजत रहातात. हे संगीत तिला काही सांगायचा प्रयत्न करत आहे. एकदा तर त्या संगीताच्या धुंदीत ती प्रेतयात्रेत वाजवायची धून चर्चमध्ये वाजवते. आणि परिमाण स्वरूप नोकरी गमावते.
ती अपघातात वाचली आहे.पण तिचा आत्मा वाचला आहेका? Actually she has lost her soul. तिला धर्म, पुरुष, सेक्स मध्ये काही रुची उरली नाहीये.
शरीर आहे पण आत्मा नाहीये, त्यामुळे तिला कशातही आत्मीयता वाटत नाही. हे अनेक प्रसंगातून आणि संभाषणातून ध्वनित केले गेले आहे.
जाता अजून एक. बरेच काही लिहीनेबल आहे. फक्त एकच.
एका समीक्षाकाराच्या मते हे मेरीला पडलेले दुःस्वप्न आहे. तिची कार जेव्हा रेलिंग तोडून नदीत पडते त्या एक दोन सेकंदात हा एक तासाचा चित्रपट घडतो.
तिला मरायचे नाही. जगायचे आहे. तिचा हा मृत्यूशी केलेला संघर्ष आहे.
शेवटी ती हरते आणि मृतात्म्यांच्या जगात परत जाते. बरोबरच आहे म्हणा. मृत्यू समोर कोण जिंकला आहे?
चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये आपण बघतो कि ती गाडी नदीतून बाहेर काढली जाते.
त्या तिन्ही मैत्रिणी मृतावस्थेत दिसतात.
(समाप्त)
( ह्या लेखाचा पहिला भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52331)






 

 

 



 

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

काकडेच्या खुन्याची कथा.