भलत्या वेळी, भलत्या जागी -2

आमच्या आधीचे दोन पेशंट तिथे बसले होते. टेबलावर पेपरांची चळत पडली होती. एक जण प्रभातवाचत होता. त्याने प्रभात टाकून सकाळ उचलला. बाबांनी चपळाईने प्रभातवर कब्जा केला. डायरेक्ट चौथ्या पानावरच्या काडीमोडच्या नोटीसा वाचायला सुरवात केली.
आमच्या अशिलाने तुला एकूण चौदा पत्रे लिहिली. तू जी लग्नाच्या आठव्या दिवशी माहेरास निघून गेलीस ती आजतागायत नांदायला परत आली नाहीस. त्यामुळे आमच्या अशिलास लग्नाचा हक्क बजावता...
घटस्फोटाच्या नोटीसा वाचून झाल्यावर बाबांनी जमीन खरेदी, साठेखत, खरेदीखत, जमिनीच्या चतुःसीमा, कब्जा ह्यांच्या नोटीसा आदिकडे मोर्चा वळवला. मी आपलासोविएत देशघेऊन चित्रं बघत बसलो.
डॉक्टर तपासणी घरातून बाहेर पडले. त्यांनी पेशंटला औषध लिहून दिले. मग खुर्चीत बसून त्यांनी सकाळ वाचायला घेतला. अर्ध्या तासांनी डॉक्टरांचा आणि बाबांचा दोघांचे पेपर वाचन संपले. दोघे एकमेकांकडे बघून हसले.
चला माझी केस एकदाची ऐरणीवर येणार म्हणून मला बरं वाटलं.
प्रभातने वारा घेत बाबा म्हणाले, “कैच्या काही गरम होतंय. नाही का?”
डॉक्टरांनी बराच विचार केला, “एल् निनो. त्याचे प्रताप आहेत.
आता डॉक्टर रशियावर घसरले. केवळ विरोधी मत नोंदवायचे म्हणून बाबा अमेरिकेवर घसरले. थोड्या वेळाने त्यांनी आपापले व्यू पॉइंट बदलले. बाबा अमेरिकेची तरफदारी करू लागले तर डॉक्टर रशियाची. रूळ बदलताना आगगाडी खडखडाट करते पण इकडे...मी ते दोघे समेवर यायची वाट पहात होतो.
मी सोडून इतर विषयावर त्यांच्या चर्चा रंगल्या.
बरं पण आज कसे आलात. ब्लड प्रेशर ठीक आहेना?” डॉक्टर अखेर मुद्द्यावर आले.
कोण मी? छ्या. मला काय धाड भरलीय? आमचा हा बबन! टॉनसिल्स सुजल्या आहेत असं म्हणतोय. जेवणावरची वासना उडाली आहे. एक उल्टी केली. तुम्हीच बघा आता.बाबांनी माझी केस तिखट मीठ लावून सांगितली.
अरे बापरे! अस म्हणतोय तर. चला आत. चेक करतो.
डॉक्टरांनी मला त्यांच्या टेबलावर आडवा घेतला. प्रथम छाती तपासली. दीर्घ श्वसन घेअशी ऑर्डर देऊन आता सोडपर्यंत श्वास मापक वापरून झालं. पोटात निरनिराळ्या ठिकाणी चाचपणी केली. रबरी हातोड्याने पाय आणि गुढगे ठोकले. दोनी दंडावर रक्त दाब मापन झाले. कानात झाकून झाले. बोटांची नखं तपासली. डोळ्यात प्रखर प्रकाश झोत टाकून झाले.
थोडक्यात टॉनसिल्स सोडून सर्व अवयवांची तपासणी झाली.
काही प्रॉब्लेम दिसत तर नाहीये.डॉक्टर निराश आणि दुःखी झाले होते. असे पेशंट आले तर धंद्याचं कसं होणार?
मग आता काय.
““मग आता काय.काय? धायगुडे, मुलगा एव्हढा हट्ट करतोय तर करून टाका ऑपरेशन. टॉनसिल्सचं काय आज नाहीतर उद्या सुजतील. तुमचा फॅमिली डॉक्टर म्हणून तुम्हाला योग्य सल्ला देणं माझं कर्तव्य आहे. माझं ऐका. प्रिवेन्शन इज बेटर दॅन काय म्हणतात ते हा- आपलं तेच ते. ह्या त्या इस्पितळात माझा वार असतो. तिथेच करून टाकू. तुम्हाला टेन परसेंट डिस्काउंट मिळेल. ते माझ्यावर सोपवा.
विचार करत बाबा म्हणाले, “विचार करुन सांगतो.
बाबा डळमळीत झाले होते हे मात्र निश्चित. मी खूष.
शेवटी एकदाचे ऑपरेशन करायचे ठरले. येणाऱ्या शनिवारचा दिवस निश्चित झाला. तो दिवस मला लाभत होता. म्हणून त्या शनिवारी.
मी अभिमानाने ही बातमी शाळेत फोडली.
सगळ्या मुलांना माझ्या बद्दल आदर वाटू लागला.
बबड्या मज्जा आहे बुवा तुझी.मी वर्गाचा हीरो झालो होते. अगदी अकरावीतली मुलं देखील मधल्या सुट्टीत माझ्या दर्शनाला येऊ लागली. मी पण कॉलर ताठ करून चालायला लागलो. त्यावेळी जर कोणी फिलर गेज वापरून माझे पाय आणि जमीन ह्यातली गॅप मोजली असती तर सहज एक इंचाची भरली असती.
पवारने माहितीत थोडी भर टाकली.
बबड्या, ऑपरेशनच्या आधी भूल देतात. म्हणजे नाकावर एक जाळी ठेवतात. आणि त्याच्यावर कुठलातरी फार्म ओततात. आणि आकडे मोजायला सांगतात. एक दोन तीन चार पाच मोजेपर्यंत शुद्ध हरपते. मग ऑपरेशन करतात. जागतिक रेकॉर्ड आहे अकराचं. आपल्या शाळेचं रेकॉर्ड आहे सातचे. प्रभाकर ढेकणेचं. अकरा वर्षापूर्वीचे. बघ तुला तोडायला जमतेय का.
मी वर्ल्ड रेकॉर्ड तोडायचं निश्चित केलं.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
शनिवारी बाबा मला इस्पितळात घेऊन गेले. जाताना आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले. घरातल्या देवांना नमस्कार केला. आईने हातावर दही ठेवले. लवकर परत ये रे बाळा.
बाबा काहीतरी लागट बकणार होते पण त्यांनी स्वतःला सावरले.
ऑपरेशन टेबलावर झोपलो. डॉक्टर कापाकापीची तयारी करत होते. मी आपला आढ्याकडच्या शॅडोलेस लँपकडे बघत वेळ काढत होतो. डॉक्टरांचा नर्सबाई बरोबर पाचकळपणा चालला होता. माझ्या सारख्या लहान मुलाला समजणार नाही असे त्यांना वाटत असावे. असो.
मला भूल केव्हा दिली गेली आणि मी किती आकडे मोजले हे सांगण्यात आता काही अर्थ उरला नाहीये. त्या ऑपरेशनने माझ्या जीवनात अभूतपूर्व उलाढाल केली आहे.
मी केव्हढ्या मोठ्या भूलमधून बाहेर पडलो.
२०४३.
सध्या २०४३ चालले आहे.
बरोबर आहे? माझे वय आज मितीस किती आहे? मला माहित नाही. पण माझ्या ऑपरेशनचा दिवस जणू ऑपरेशन कालच झाले इतका स्वच्छ आठवत आहे.
ह्यापुढे मी जे काय इथे लिहिणार आहे त्यावर कोणी विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही. तशी अपेक्षा नाही. अपेक्षा एव्हढीच आहे कि कुत्सित टीका टिप्पणी करू नये. आपल्याला जर वाटत असेल कि लेखक वायझेड आहे तर असू दे. ते मत आपल्यापाशीच ठेवा. कारण मग एक्झॅक्टली कोण वायझेड आहे असा वाद सुरु होईल आणि मी पैजेवरून सांगतो की तुम्ही हराल. तर मी काय सांगतो आहे ते नीट ऐका.
परग्रहावरून आलेल्या कृत्रिम बुद्ध्यांनी पृथ्वी काबीज केली आहे. आणि मूळ निवासी मानवांना हद्दपार करून त्यांच्या जागी जागो जागी डमी उभ्या केल्या आहेत.
माझे ऑपरेशन झाल्यावर साधारणपणे चार एक तासांनी मी शुद्धीवरआलो. माझ्या बेडच्या बाजूला एक बाप्या बसला होता. हा का इथं बसला आहे?
त्याने हलक्या गोड आवाजात विचारले, “बबड्या, आलास शुद्धीवर? आता कसं वाटतंय?”
बरं आहे. पण तुम्ही कोण? माझे बाबा कुठे आहेत.
बबड्या, चार तासात मला विसरलास कि काय?” त्या माणसाने उलट मलाच विचारले.अहो नर्सबाई, हा पहा कसा डोक्यावर परिणाम झाल्यासारखा बडबडतोय. मी त्याचा बाप आहे पण हा मला ओळखत नाहीये.
नर्सबाई धावत आली.
ओ बाबा ओरडू नका. इथं दुसरे पेशंट आहेत. त्यांना त्रास देऊ. काय झालाय. काय रे मुला, हे तुझे बाबा नाहीत?”
नाहीत. माझ्या बाबांना मिशी होती.
ह्या ह्या ह्या असा आवाज करून नर्स खिंकाळली.
ह्याला भूल चढली आहे. भूल ह्याच्या डोक्यात गेली आहे. हजारात एक केस होते अशी. ह्याला तुम्ही आईस्क्रीम खायला घाला. म्हणजे ह्याला सुधरेल.
बिनामिशिवाल्याने जाऊन माझ्यासाठी आईस्क्रीम आणले.
हे घे बबड्या, तुझ्या आवडीचे सिताफळ आईस्क्रीम आणलय.
कमाल आहे मी आयुष्यात प्रथम आईस्क्रीम खात होतो आणि हा म्हणतोय तुझ्या आवडीचे.
आईस्क्रीमची चव अप्रतिम होती. माझ्या ओरिजिनलबापा पेक्षा हा बाप प्रेमळ निघाला. ह्याचा बाप म्हणून स्वीकार करावा का?
हा रोज आईस्क्रीम खायला देईल काय? मी त्या वेळी अश्या (फाउल) मूडमध्ये होतो कि आईस्क्रीम पॉटला पण बाप मानायला तयार झालो असतो.
थोड्या वेळाने मोठे डॉक्टर राउंडवर आले.
ह्याचा काय प्रॉब्लेम आहे?” नार्सबाईने पुढे होऊन माझा प्रॉब्लेमवर्णन केला.
हट, अशी भूल डोक्यात वगैरे जात नाही. थांबा. मी ह्याला तपासतो.तेच ते. टॉनसिल्स सोडून सर्व तपासण्या झाल्या. हा पूर्ण फंक्शनल आहे. आणि जिवंत आहे. तुम्ही कोण? ह्याचे बाबा का? हे पहा. तुम्ही ह्याला जिवंत आणला होता. आम्ही ह्याला जिवंत परत करत आहोत. तुमच्या इच्छेनुसार आम्ही ह्याच्यावर ऑपरेशन केले. ह्याची जाणीव नेणीव व्यवस्थित आहे. तुम्ही ह्याला ताब्यात घ्या. ह्या फॉर्मवर सुखरूप जिवंत मिळाला. रिसीव्ह्ड इन गुड कंंडीशनअसे लिहून सही मारा. नर्स ह्यांची फाईल बिलिंगला पाठवा आणि डिस्चार्ज कागद बनवा.
अहो पण हे माझे बाबा नाहीत. माझ्या बाबांना मिशी आहे. ह्याला नाही.मी तक्रारीच्या सुरात म्हणालो.
हे पहा, मिशी ठेवायची कि नाही हा तुम्हा पिता पुत्रामधला वाद इथं नको. हे काही कटिंग सलून नाही.डॉक्टरांनी पुढच्या पेशंटकडे मोर्चा वळवला.
बिनामिशिवाल्या बाबा मला कार मध्ये बसवून घरी घेऊन गेला.
काय मजा आहे बघा मी १९६० साली टांग्यातून इस्पितळात आलो. आणि आता २०४३ साली कारमध्ये बसून हॉस्पिटल मधून परत चाललो होतो.
पुन्हा आउट ऑफ स्टेप विथ स्पेस अँड टाईम!
फ्लॅट एकदम चकाचक होता. कुठे आमचे शुक्रवारातले अंधारी चार खणी घर. आणि कुठे हा झगमग झगमग थ्री बेडरूम फ्लॅट.
फ्लॅटमध्ये बिनबाह्याचा झगा घातलेल्या बाईने आमचे स्वागत केले. माझ्या पेक्षा थोडा मोठ्या मुलाने माझ्याकडे पाहून हास्य केले.
हेल्लो डीअर सन, झालं ऑपरेशन?...”
इतक्यात काहीतरी संगीतधून वाजली. त्या बाईने साबणाच्या वडी सारखे काहीतरी हातात घेतले आणि त्याच्याशी बोलायला सुरवात केली.
येस स्सर.ती तो साबणाची वडी घेऊन दुसऱ्या रूममध्ये गेली. मला अस्पष्ट ऐकू येत होतं. मी एक्स ४१९ बोलते आहे. समजलं सर, सब्जेक्ट बॉय... आता आमच्या ताब्यात आहे. गोंधळलेला दिसतोय. माझं बारीक लक्ष राहील. बाय.
ती बाई परतली. मोठ्या सरांचा फोन होता. ऑपरेशन यशस्वी झालं काय विचारत होते...
एकूण असं दिसत होतं कि ह्या लोकांची गँँग असावी आणि त्यांनी मला कैद केलं असावंं.
तो मुलगा माझ्या जवळ येऊन बसला.
बबन, खूप त्रास झाला कारे?”
नाही, भूल दिली होती ना. पण तू कोण?”
अरे मी तुझा दादा.मला एकदम पिवळा हत्ती आठवला.
पिवळा हत्ती?”
नाही रे. ते दिवस गेले...त्याला बोलायची इच्छा असावी तेव्हढ्यात ती झगावाली बाई आली. तो चूप झाला.
मी सगळ्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होतो.
तिने आम्हाला आईस्क्रीम दिले. आणि म्हणाली, “आता दोन तीन दिवस हेच खायचं बरका.
ती निघून गेल्यावर मी दादाला विचारलं, “ही कोण?”
ही आपली आई.
कुठे नऊ वारी नेसणारी माझी आई आणि कुठे ही झगावाली.
मला माझ्या आई बाबांची आणि दादाची आठवण आली. मन भरून आले. काय करावे, कुठे जावे, कुणाशी बोलावे? विश्वास तरी कुणावर ठेवायचा.
आमच्या शेजारी टिल्लू नावाचे कुटुंब राहते. त्या पैकी एक टिल्लू माझ्यापेक्षा जरा मोठा आहे, त्याचं नाव आहे रघू. तो जरा विश्वासू वाटला. त्यालाच विश्वासात घ्यायचं ठरवलं.
रघू, तो इसम चाललाय तो...
ते तर तुझे बाबा!
त्यानंतर मी पुढे काही विचारलं नाही.
तशातच तो थरकाप उडवणारा प्रसंग!
एकदा दादा आणि मी माझ्या रूम मध्ये विडीओ गेम खेळत होतो. बघता बघता दादा कोलमडला. मी घाबरून ओरडलो, “दादा अरे काय झाले? बोलत का नाहीस?”
माझा चढलेला आवाज ऐकून झगावाली आणि बिनामिशीवाला धावत आले.
काय झालं?” मलाच माहित नाही तर मी काय सांगणार ? सुदैवाने दादा लगेच शुद्धीवर आला होता. मी बाजूला घाबरुन उभा होतो.
दोन मिनिटे डोळ्यासमोर अंधेरी आली. आता ठीक आहे.दादा आता चांगलाच सावरला होता.
दुसऱ्या दिवशी माझे तोतया आई बाबा दादाला घेऊन डॉक्टरकडे गेले.
परत आले तर दादा बरोबर दिसला नाही. दादा कुठाय?” मी विचारले.
त्याला रिपेर करायला टाकलं आहे. आय मीन त्याचे ऑपरेशन करायचे आहे. डॉक्टर म्हणत होते कि थोडे दिवस हॉस्पिटल मध्ये राहावे लागेल. पण तू काळजी करू नकोस.झगावाली हसत हस्त सांगत होती.
ऑपरेशन म्हणजे रिपेर!
मला माझे ऑपरेशन आठवले. मी पण रिपेर होऊन आलो होतो का?
मी दादाला भेटून येऊ का?” मला दादाची तीव्र आठवण होत होती.
नको, नको.झगावाली आई घाईघाईने म्हणाली. तिथे विजीटरना परवानगी नाही,”
हे लोक माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवत होते. पण काय? दादाचे काही बर वाईट झाले होते का? पण हे दोघं मजेत बर्गर खात, कॉफी पीत हसत खिदळत होते. म्हणजे तितकं काही सिरिअस नसावे. पण मला स्वस्थ बसवत नव्हते. संध्याकाळी बाहेर फिरायला जातो असं सांगून घराबाहेर पडलो आणि सरळ हॉस्पिटलचा रस्ता पकडला. रस्त्यात अनेक लोक दिसले. पण एकाच्याही डोळ्यात चमक नव्हती. चेहऱ्यावर बरे वाईट, सुखी दुःखी, रंजले गांजले असे कुठलेही भाव नव्हते. कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस माणसे. रस्त्यात सगळीकडे कॅमेरे. मी जसा जसा पुढे पुढे जात होतो तसा तसा मागचा कॅमेरा मला पुढच्या कॅमेरयाकडे सुपूर्द करत होता. जणू कॅमेरयांची रीले रेस.
असं करत करत हॉस्पिटल पाशी आलो. गेटवर सुरक्षाव्यवस्था होती. म्हणजे प्रवेश निषिद्ध! मग मागच्या बाजूच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरलो. एकेक दालनात डोकाऊन बघत गेलो. पेशंट शांतपणे झोपले होते. मधेच एका दालनात बघितले तर दादाचे मुंडके दिसले. धड एका बाजूला होते. दादाचे मुंडके माझ्या कडे बघत होते. दादाच्या मुंडक्यात काही तारा जोडल्या होत्या. त्या ओसिलोस्कोपला जोडल्या होत्या. एक डॉक्टर त्याची रीडिंग घेत होता. मुंडक्याची आणि माझी नजरा नजर झाली आणि त्याने डोळे वटारले. मला त्याचे बोलणे स्पष्ट ऐकू आले.
इथं कशाला तडमडलास. पळ घरी जा.
पुढचे काही आठवत नाही. मी माझ्या घरी माझ्या बेडवर शुद्धीवर आलो.
त्य दिवशीपासून मला एका अनामिक भीतीने घेरले आहे. ह्या अफाट जगात मी एकटाचमाणूसउरलो आहे का? सगळी ओरिजिनल माणसं कुठं आहेत? मीच का ह्यांच्या तावडीत सापडलो आहे. ह्यांनी मला चोहोबाजूंनी घेरले आहे. सुटकेची सुतराम आशा नाही, पण मीच का? का असं तर नाही कि मी पण त्यांच्यातला एक आहे? ओरिजिनल मी ला पळवून खोट्या खोट्या मी ला -खोटा मी म्हणजे मीइथं खऱ्या मीच्या जागी बसवले आहे.
हा तिढा सुटावा कसा? आहे एक मार्ग आहे. स्वयंपाकगृहातली सुरी घ्यायची आणि मनगटाला एक छेद घ्यायचा. मग समजेल कि माझ्या शरीरात स्नायू आहेत कि फायबरच्या लडी आहेत, रक्त आहे का कूलिंग फ्लुइड आहे, रक्तवाहिन्या आहेत की प्लास्टीकच्या बारीक नळ्या आहेत, मज्जातंतू आहेत की तांब्याच्या अतिसूक्ष्म तारा आहेत.
पण ही टेस्ट करायचे धैर्य माझ्यात नाही. मी जखमेला घाबरत नाहीये. पण सत्याला सामोरे जायला हिंमत लागते ती माझ्यात नाही. ही टेस्ट केल्यावर जर मी रोबोट आहे असे निष्पन्न झाले तर? तर माझ्या अस्तित्वाचा डोलारा कोसळून पडेल. ते मला सहन होण्यासारखे नाही. खऱ्या मीचा शोध घ्यायची जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडेल. ती माझ्याच्यानं निभावणारी नाही.
त्या ऐवजी आहे हे काय वाईट आहे?
आता मी त्या बिनमिशीच्या रोबोटला बाबा म्हणतो, गोऱ्यापान नाकेल्या रोबोटनीला आई अशी हाक मारतो. रीनोव्हेट होऊन परत आलेल्या रोबोटला दादा समजतो. तसे स्वभावाने ते चांगलेच आहेत. माझ्यावर त्यांचे अलोट प्रेम आहे. पण त्यांच्यात ते जे काय असते तेमिसिंग आहे. मी माणूस आहे की रोबोट आहे त्याची फायनल टेस्टमी करणार नाहीये. आहे ते काही वाईट नाहीये.
(समाप्त)

 

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

काकडेच्या खुन्याची कथा.