जनरेशन गॅप!
पांडुरंग
स्वतःवरच भनकला होता. शेजारचा श्रीरंग तो किती हुशार होता. ते काय म्हणतात न हां
स्मार्ट! सगळेजण त्याची स्तुति करतात. पोरीबाळींशी बोलताना तर विचारायला नको. असा
लाळघोटेपणा करतो. पण कामात मात्र चुकार. साधी बेरीज वजाबाकी करण्यात हजार चुका.
वाण्याकडे सामान आणायला गेला तर वाणी त्याला हमेशा चुकीची मोड देणार! त्याचा मालक
दहादा त्याच्याकडून हिशेब करून घेणार, मालक बिचारा म्हातारा झालेला, पहिल्या
तारखेला येणाऱ्या पेन्शनवर सगळा महिना काढायाचा . त्याला पै न पैची काळजी असणारच.
आता ह्या वयात रंग्याला काढून दुसऱ्या कुणाला ठेवायचे म्हणजे जीवाला केव्हढा घोर.
निदान रंग्या डोक्यात दगड घालून उरलेसुरले डबोले घेऊन सूबाल्या करणार नाही एवढी
मालकाला खात्री होती.
त्यामुळे रंग्याचे मालक रंग्यावर कायम उखडलेले ह्यात नवल ते काय,
ते कधी मधी दादासाहेबांकडे सुख दुःखाच्या वार्ता करायला यायचे
तेव्हा हमखास तक्रारीचा सूर लावायचे. “’दादा तुम्ही खरच सुखी
बुवा. तुम्हाला असा गुणी नोकर मिळाला. चांगले नोकर मिळायला देखील नशीब लागते. नाही
म्हणजे आमचा रंग्या! काल त्याला वाण्याने हातोहात फसवले. त्याला मी शंभर रुपयांची
नोट देऊन जिन्नस आणायला वाण्याकडे पाठवले. बिल एकूणसत्तर रुपयांचे झाले. तर ह्याने
एकतीस रुपये परत आणायला पाहिजेत ना? ह्याने माझ्या हातावर
एकवीस रुपये टिकवले. त्याला शेवटपर्यंत आपली काय चूक झाली ते समजले नाही. आता बोला!”
पांडुरंग काही मुद्दाम ऐकायला गेला नव्हता. तो तिथे चहा करत होता.
सहज कानावर पडले ,ऐकले. इतकच.
“मी सांगू तुम्हाला रावसाहेब. तुम्ही आपली काळजी घेत जा. घ्या चहा
प्या.” दादा साहेबांनी त्यांची समजूत घालायचा प्रयत्न केला.
“पांडुरंगा, वा व्वा! काय फक्कड चहा बनवला
आहेस. नाहीतर आमचे ध्यान. कधी साखर जास्त तर कधी उकळून उकळून कडू जहर. कधी साखर
टाकायचं विसरणार. मला काय डायबेटीस झाला आहे का? नाहीतर
तुमचा पांडुरंग पहा. त्याला पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी,
अडीचकी, औटकी, एकोत्री
येते. नाहीतर आमचे ध्यान. मी म्हणतो पावकी बिवकी सोडून द्या पण बेरीज वजाबाकी?
ते सुद्धा नाही?”
“रावसाहेब बास बस झाले. पांडुरंगाची जास्त स्तुती नको. झाली एवढी
पुरे. नाहीतर शेफारून जायचा. डोक्यावर चढायचा ”
असा हा श्रीरंग, सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा,
सर्वसाधारण म्हणजे अगदी सर्वसाधारण. त्याची स्मरणशक्ती काही
मिनिटांचीच होती. असे सांगतात की काचेच्या पात्रांत ठेवलेल्या सोनेरी माशाची
स्मरणशक्ती एका फेरीपुरती असते. दुसरी चक्कर सुरु झाली की क्षणापूर्वी पाहिलेले जग
त्याला पुन्हा नव्याने भुलवू लागते. आपल्याला अशी स्मरणशक्ती असती तर किती मज्जा
आली असती. काल लोकांनी केलेले अपमान विसरून आज आपण नव्याने जगू लागलो असतो.
एवढे असून सुद्धा मुली मात्र श्रीरंगवर जाम खुश.
पांडुरंगाला मालकाची मुलगी कोमल, ती खूप
आवडायची. तिचे लक्ष मात्र श्रीरंगकडे.
पांडुरंग तसा अचाट बुद्धीमत्तेचा. (त्याला कुठल्याही आकड्याचे
वर्गमूळ विचारा, पाच क्षणाच्या आत तो बरोबर उत्तर देईल) मी
त्याच्या अलौकिक बुद्धीमत्तेच जास्त कवतुक सांगत बसत नाही कारण ती अचाट बुद्धी
म्हणजे त्याच्या शरीराला चिकटलेलं निरुपद्रवी बांडगुळ होते. ज्या तरुणाला दुसऱ्या कुणाही
मानवाशी अर्थपूर्ण संवाद साधता येत नाही त्याला पाढ्यांचा, वर्गमूळांचा
आणि घनमूळांचा काय उपयोग? संपूर्ण टेलेफोन डिरेक्टरी तोंडपाठ
आहे पण त्यातला एकही नंबर असा नाही की ज्याला आपण आपुलकीने फोन करून थोडा वेळ
गप्पा मारू शकू. काय उपयोग! उगीच कशाला गाढवा सारखे डिरेक्टरीचे ओझे वागवायचे?
श्रीरंग त्याला जवळ जवळ दरदिवशी भेटत असे. रोज त्यांच्या गप्पा
चालत. खर तर श्रीरंग बडबडत असे नि पांडू फक्त ऐकण्याचे काम करत असे.
“आज टीवी वर शहारुखचा “बादाशहा” लागला होता. काय भन्नाट पिच्चर आहे. एकदम विनोदी,” रंग्या
हसत हसत पांडूला सांगत होता.
“काय एवडे विनोदी काय होत? पिक्चरची गोष्ट
सांग. किमान त्यातला एक जोक सांग.”
“ते काय मला आठवत नाही. तू स्वतः बघ ना. उद्या पुन्हा.....हाय कोमल!
ह्या ड्रेसमध्ये तू......”
झाल श्रीरंग पांडूला विसरला आणि कोमलला चिकटला.
पांडूचे नशीब हे असे होते.
पांडू आता अंथरुणावर पडला होता, पण डोळ्यात
झोप कुठे? कोमल आणि श्रीरंगाचे विचार डोक्यात पिंगा घालत
होते. आपले हे खत्रूड नशीब बदलता येईल काय?
“हाय पांडू! हाऊ यू!” पांडू दचकला. कुणीतरी
मुलगी त्याला हाय हलो करत होती. त्याचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. आवाज
स्पष्ट ऐकू येत होता. आपल्याला भास झाला असावा. सगळं विसरून त्याने पुन्हा “नशीब कसे बदलावे” ह्या विषयावर मनन चालू केले.
“पांडू, अरे पांडू मी बोलते आहे. लक्ष कुठे?”
“मी? ‘मी’ कोण आहे?”
“तू असे तत्वज्ञानातले गहन प्रश्न का विचारतो आहेस. म्हणे मी कोण?
कोSहम? म्हणतात ना की
नावात काय आहे? सध्या पुरते तू मला सखी समज.”
अश्या प्रकारे त्या सखीने पांडूच्या जीवनात प्रवेश केला.
“तुला तुझे नशीब बदलायचे आहे ना. मी तुझे नशीब हा हा म्हणता बदलून
देईन. मला माहीत आहे तुझ्या मनात काय चालले आहे. तुला कोमलशी मैत्री करायची आहे ना.
मी तुला मदत करेन.”
“अरे पण तू कोण आहेस? तुझा आणि माझा काय
संबंध. अशी जरा पुढे येऊन समोर उभी रहा. पाहू दे तरी मला.”
“पांडू, मी तुझी मैत्रीण, आई, आत्या, आज्जी. मावशी,
दीदी, वहिनी, शेजारीण,
गृहिणी, सचिव, सखी.
प्रियशिष्या ललिते कलाविधौ, मिस टीचर, हेड
बाई, धुणीभांडीवाली बाई, केळेवाली....”
“प्लीज, केळेवालीची आठवण नको काढून देऊस.
तिच्या बरोबर नाच करून चांगली तीस चाळीस वर्षे झाली असतील. ते जाऊ दे. पण तू दिसत
का नाहीस?”
“मी तुझ्या डोक्यात आहे. तुझी दयनीय अवस्था पाहून जगदीश्वराला तुझी
दया आली. त्याने आवाहन करून मला बोलावले आणि आज्ञा केली, “जा,
पांडूनामक अज्ञान बालकाला सज्ञान कर.” खर
म्हणजे ही त्याचीच चूक होती. त्याचे काय आहे , आपण परमेश्वराची
चूक काढून त्याच्या पदरात टाकू शकत नाही ना. ठीक आहे. देर आयी हूँ, लेकीन दुरुस्त आयी हूँ. तू आता निश्चिंतपणे झोप, उद्यापासून
ऑपरेशन कोमल सुरु!”
सकाळी सकाळीच दादासाहेबांनी पांडूला पकडले.
“पांडोबा, कोमलचा अभ्यास कसा चालू आहे. ह्यावर
पांडू काय उत्तर देणार? तिचे अभ्यासांत लक्ष नाही असं खरं
बोलायला तो घाबरत होता असे नाही पण अगदी स्पष्ट बोलणेही त्याला प्रशस्त वाटत
नव्हते.
“काही घाबरू नकोस, सांग त्यांना “माझी खात्री आहे की छोटी मालकीण गणितात चांगले गुण मिळवेल” सांग ठासून.” सखी त्याला मागून प्रॉम्प्ट करत होती.
दादासाहेबांना एवढे सांगता सांगता पांडूला घाम फुटला.
“पांडू, घाबरू नकोस. तू तिला गणिताचा विषय
सोप्पा करून शिकव. तू सोप्या आणि मनोहारी गणितविषयाला किचकट करत आहेस. आधी स्वतः
गणित शीक. गणितासारखा नितांत सुंदर विषय........”
“सखी, सर्व लोक तर माझी स्तुती करतात आणि तू
म्हणतेस की माझे गणित कच्चे आहे”
“गणित म्हणजे निव्वळ पाठांतर किंवा घोकंपट्टी नाही. देवाने जेव्हा पाहिल्या
स्त्री-ईव्ह- ची निर्मिती केली तेव्हा भूमितीतल्या सगळ्या कर्व्सचा भरपूर वापर
केला. ते तुला कोमलमध्ये दिसले नाहीत? बेटा विश्वात जळी,
स्थळी, काष्ठी. पाषाणी अवघ्या चराचराला
व्यापून डेल्टा डेल्टा उरते ते हे गणित! पांडूरंगा असे असते गणितशास्त्र!”
“सखी, माझ्या डोक्यांत थोडा थोडा प्रकाश पडला
आहे. थॅंक्स. पण कोमल शिकवणीसाठी येत आहे. मधे मधे बोलून माझे लक्ष विचलित करू
नकोस.”
“पांडू, तिला मालकीण म्हणू नकोस, तिचे नाव कोमल आहे हे ल्क्षात ठेव.”
कोमल पुस्तक घेऊन स्टडी मध्ये आली.
“गुड मॉर्निंग गुरुजी.” कोमल हलक्या आवाजात
बोलली.
“कोमल, माझे नाव पांडुरंग आहे. तू मला गुड
मॉर्निंग पांडू किंवा गुड मॉर्निंग सर म्हण. हे गुड मॉर्निंग आणि गुरुजी मॅच होत
नाही. दाताखाली खडा आल्यासारखे वाटते.”
दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हे मी काय बोललो आणि हे मी काय
ऐकले.
“वा पांडोबा पहिली पायरी झटक्यात पार पाडलीस.” सखीने कूsss केले.
“आज गणिताचे पुस्तक बाजूला ठेव आय मीन ठेवा छोट्या माल— कोमल.” पांडूची बोलताना फे फे उडत होती.
कोमल पेन्सिलने वहीवर तेघोट्या मारत त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत
होती. पांडूचे शरीर त्या नजरेच्या मोरपिसाने पुलकित झाले. त्याने पुन्हा एक्दा स्वतःचा
ताबा घ्यायचा क्षीण प्रयत्न केला. त्याला म्हणायचे होते, “मालकीण
बाई, आज आपण लॉगरीदमचा अभ्यास कराणार आहोत. पुस्तकाचे पान
एक्काहत्तर पहा.” त्याऐवजी त्याच्या तोंडातून निघाले,
“कोमल, आज आपण ‘तू अशी
जवळी रहा’ ह्या महान कविवर्य मंगेश पाडगांवकर ह्यांच्या
रचनेचा आस्वाद घेणार आहोत. मी ही काव्य रचना आधी तुला डिक्टेट करतो ती तू लिहून
घे.”
पांडूने धीम्या आवाजांत सांगायला सुरुवात केली.
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे
पाण्यातुनी
शुक्रतारा, मंद वारा, चांदणे
पाण्यातुनी
,,,,,,,,,,,
पांडू सखीवर जाम वैतागला. जर का ही गोष्ट दादांच्या कानावर गेली तर
काय अनर्थ होईल. सखीला दादांचा स्वभाव माहित नसणे साहजिक होते.कारण ती आत्ता आत्ता
आली होती. उगाच नाही ते सभापती झाले होते.
“मला दादा माहित आहेत चांगले.पण ही गोष्ट त्यांच्यापर्यंत जाईल कशी?”
“ह्या कोमलने जर तक्रार केली तर?” नुसत्या
कल्पनेनच त्याला घाम फुटला.
“ती का म्हणून तक्रार करेल? उलट ती खुश झाली
आहे. जरा पहा तिच्याकडे.” सखीने त्याचे लक्ष कोमलकडे वेधले.
कोमल स्वप्नांच्या दुनियेत हरवली होती. “आता हेच गाणे चालीत
गाऊन दाखव तिला.”
“मी आणि गाणार?”
“किती गोड गाणे आहे हे. पांडुरंग सर, हे गाणे
गाऊन दाखवा ना. माझ्यासाठी. प्लीज.”
पांडूने डोक्यातले सखीचे भूत झुगारून दिले. त्याला मुळीच गायचे
नव्हते.
“मी --- त्याने कर्कश्श आवाजात बोलायला सुरवात केली. त्याच्या
तोंडून बाहेर पडला तो मधाळ आवाज, “का नाही? तू प्लीज म्हटल्यावर मला गायला पाहिजेच.”
त्याने भावनांनी थबथबलेल्या आवाजांत गायला सुरुवात केली. आवाज इतका
भावूक झाला होता की त्या प्रसिध्द ओरिजिनल गायकाची सुधारलेली आवृत्ति जणू.
गाणे संपले. पांडू भानावर आला. “झाला एव्हढा
अभ्यास पुरे. आज रात्री तू ह्या कवितेचे मनन आणि चिंतन कर. उद्या आपण ह्या “गाने पे चर्चा” करू.
मी वर लिहीले आहे “पांडू भानावर आला.” पण पांडूचे हे शेवटचे वाक्य वाचून तुम्हाला काय वाटतेय? खरच तो भानावर आला होता?
“सखी, हे तुझ्यामुळे झालं. मला हा मंगेश
पाडगांवकर हे कोण इसम आहे? मला माहित नाही. त्याने काय गाणं
लिहीलं आणि मी ते गाऊन काय दाखवले. आता हे प्रकरण दादासाहेबांपर्यंत जाणार आहे.
तुझ्यामुळे माझी ही नोकरी गेल्यात जमा आहे.”
“अरे काही घाबरू नकोस. मी आहे ना. आता तू सुरुवात केली आहेस. तुला
माहित आहे ना की हाती घ्याल ते तडीस न्या. फक्त मी सांगते तसे वाग, तसे बोल. यश आपलेच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकरांविषयी बोलायचे तर तुला
अनंत गोष्टी माहित आहेत. तुझे आहे तुजपाशी. काय काय माहित आहे ते तुला माहित नाही.
जशी जशी तुला स्वतःची ओळख होईल तसे तसे तुला कळायला लागेल. जेव्हा बालकाचा जन्म होतो
तेव्हा त्याला आई बाबांच्या गुणांची बेरीज वजाबाकी मिळते. पण आई बाबांनी कष्ट करून
मिळवलेले ज्ञान मात्र मिळत नाही. त्याला स्वतःला कष्ट करून ते साध्य करावे लागते.
काय हा वेळेचा अपव्यय! पण तुला तुझ्या दोन पूर्वज पिढ्यांनी अर्जित केलेले ज्ञान
सुखेनैव मिळाले आहे. ज्या कुणी तुझी निर्मिती केली त्याचे आभार मान, त्यामुळे तुला मंगेश पाडगांवकर आणि त्यांचे काव्य वेळेवर आठवले. काही
समजले? नाही? समजेल हळू हळू.”
अश्याप्रकारे कोमल आणि पांडुरंग ह्यांच्या प्रेमाची ठिणगी पडली,
त्या ठिणगीचा वणवा होण्यास वेळ लागला नाही. त्याच्या तपशीलात जायची आपल्याला
गरज नाही. कारण ही काही कुणा एका पांडूची प्रेमकहाणी नाही. आपली जर अशी अपेक्षा
असेल की आपल्याला एक चमचमीत, गुलगुलीत, मधाळ “बॉय मीट्स अ गर्ल” टाईप
कथा वाचायला मिळेल, तर आपला अपेक्षाभंग करताना मला वाईट
वाटते आहे. रॉंग नंबर! 404! परत फिरा.
“सखी, आज मी ह्या प्रेमाचा साक्षमोक्ष लावून
टाकणार आहे. आज मी दादासाहेबांकडे जाऊन कोमलला मागणी घालणार आहे. तुझा आशीर्वाद
पाहिजे. तू आमची गाडी इथपर्यंत ढकलली आहेस. आता ती टॉप गिअर मध्ये टाकून
मुक्कामाला पोचव. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कर.”
“जा. वत्स जा. नियोजित कार्यात तुला यश मिळेल ही माझी खात्री आहे.
तुजप्रत कल्याण अस्तु.” सखीने पांडूला आशीर्वाद दिला.
पांडू धकधकत्या हृदयाने निघाला. ह्यावेळी दादासाहेब त्यांच्या स्टडी
रूम मध्ये पुस्तक वाचत बसलेले असतात. पांडू तिकडेच निघाला. आजूबाजूला कुणी नसणार
हे एकप्रकारे बरच होते. दादा रागावून अद्वातद्वा बोलले तर ते दोघांच्यातच राहील.
“मालक, मला आपल्याशी काही खाजगीत बोलायचे आहे.
आपल्याला वेळ असेल आणि आपली परवानगी असेल तर बोलेन म्हणतो.” पांडू
विनयाने बोलत होता.
दादासाहेबांना आश्चर्य वाटले. पांडूला खाजगी बोलायचे आहे? कमाल आहे.
“बोल पांडू बोल. काय आहे, नवीन कपडे पाहिजेत?
दिवाळीत दोन जोड घेतले. ते खराब झाले की नवीन जोडे पाहिजेत? बाकी हे तुझी पायताणं पार झिजली आहेत. सॉरी माझ्या लक्षात आले नाही. घेऊन
टाक. अजून काही?” दादा त्याला बोलायची संधी देत नव्हते.
“गोष्ट जोड्यांची नाही जोडीची आहे.. मी म्हणत होतो,” इथे पांडू अडखळला. शब्दाला शब्द जोडत तो कसाबसा बोलला, “मी आणि कोमल जोडीने आपला आशीर्वाद मागायला आलो तर....”
दादासाहेबांना क्षणभर पांडूच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही. जर
समजला असेल तर त्यांनी तसे दाखवले नाही.
“इकडे जवळ ये पांडू.” दादासाहेब हसून म्हणाले.
पांडू खुष झाला. त्याला आधी वाटले होते की दादासाहेब रागावतील. तसे काही झाले
नाही. तो उत्साहाने मालकांच्या जवळ सरकला.
(कथेच्या पुढच्या भागातील काही वर्णने तुमच्या भावनेला धक्कादायक
ठरू शकतात. adjust your sensitivity settings.)
तो जवळ येताच दादासाहेबांनी फाड्कान त्याच्या मुस्काटीत मारली.
पांडू क्षणार्धात स्टॅटिक मॅन्युअल मोड मध्ये गेला. जिथे उभा होता
तिथेच थिजला.
दादासाहेबांनी एक अश्लील शिवी हासडली. आपली टूल बॉक्स शोधून काढली.
त्यातून स्क्रूड्रायव्हर शोधून काढला.
पांडूच्या शर्टाची बटणे खोलली. आणि खसकन स्क्रूड्रायव्हर कूलिंग
फ्लुइडच्या पंपात घुसवला. लाल रंगाच्या द्रवाची चिळकांडी उडाली. वरची कातडी ओढून काढली.
पंप डोळ्यासमोर आला. पंपावर कोमलचा हसरा फोटो होता. तो काढून बाजूला ठेवला. “प्रेम करतो आहे माझ्या मुलीवर लेकाचा.”
पंपावर मोठा स्क्रू होता. तो चार आटे फिरवून घट्ट केला.
“आर यु शुअर यु वांट टू फॅक्टरी रिसेट आय डी नंबर
जी-७/२५७८३/एम/एच-क्लास एन्हान्स्ड वर्शन उर्फ पांडुरंग? जर
फॅक्टरी रिसेट करायचे असेल तर डाव्या बाजूचे लाल बटन दाबा.” दादासाहेबांनी
लाल बटन दाबले.
एका रोबोची “फॅक्टरी रिसेटची प्रक्रिया”
अशी हिंस्र होती. कल्पना करा जेव्हा जेव्हा मानवी समूहाला “रिसेट” करण्याचे अघोरी प्रयत्न झाले तेव्हा काय
हलकल्लोळ माजला असेल! केवढ्या यातना सहन कराव्या लागल्या असतील त्यांना.
“फॅक्टरी रिसेटची प्रक्रिया सुरु झाली आहे. फॅक्टरी रिसेटला पूर्ण
व्हायला अर्धा तास लागेल. तो पर्यंत आपण हिंदी/ इंग्रजी/मराठी गाणी ऐकृ शकता. हिंदीसाठी
एक दाबा........”
दादासाहेब पांडूच्या मागे उभे राहिले, पांडूच्या
डोक्याच्या मागच्या बाजूला चाचपडून त्यांना एक कळ बोटाला लागली. ती दाबल्यावर
पांडूची कवटी खाट्कन उघडली. आत प्रोसेसरची गर्दी झाली होती. पण प्रोसेसरच्या दोन
बोर्डांत फट पडली होती.
हीच ती जनरेशन गॅप!
दादासाहेबांनी टूलबॉक्स मधून एम सीलची डबी बाहेर काढली त्याची
पुट्टी केली आणि ती फट बुजवून टाकली.
“हुश्श! साले हे आजकालचे नवीन जनरेशनचे रोबोचे प्रोसेसर, खूप फास्ट म्हणून रिट्रोफिट करून घेतले. किती वेळा फॅक्टरी रिसेट.करायला
लागतात! वैताग साला! आता हे रोबो काय म्हणतात तर म्हणे, “आमच्यासाठी
रोबो हक्क आयोग नेमा. मानवांचे कायदेकानू आम्हाला पण लागू करा. आम्हाला लग्न
करायची परवानगी द्या. लग्न झाल्यावर लगेच घटस्फोट घ्यायची सुविधा द्या. विवाहबाह्य
संबंध हा गुन्हा ठरवला जाऊ नये, आमच्या हक्कांची पायमल्ली
होते आहे ती थांबवा.” आयला इथे मानव गेले झालनात, त्यांच्या मागोमाग गेले त्यांचे हक्क! त्याची कुणाला तमा नाही, त्यांना कुत्रा पण भीक घालत नाही. इकडे रोबोंचा बीचमे मेरा चांदभाई! फार
शाने झालेत. कुणाचे काय नि कशाचे काय!”
Comments
Post a Comment