'गोम' ह्या कथेविषयी काही
नमस्कार
मंडळी. मी भागो. मी विज्ञान कथा, कल्पनारम्य कथा, विचित्र कथा, माफकभीती
कथा, माफक विनोदी कथा लिहितो. काही लोकांच्या मते मी ‘काहीच्या काही’ कथा लिहितो. माझ्या कथा वाचून
वैतागलेले म्हणा किंवा कंटाळलेले म्हणा अश्या मिपा वरील एका बुजुर्ग आयडीने अत्यंत
नम्रपणे मला संदेश दिला की, “अहो तुम्ही काय लिहिता
त्याबद्दल कथेत थोडे तरी स्पष्टीकरण देत जा.”
कदाचित त्यांचा रोख असा असावा की तुम्ही काय लिहिता ते तुम्हाला तरी
समजतंय का?
सध्या माझी ‘गोम’ कथा
बोर्डवरच आहे. ह्या कथेत वैज्ञानिक कल्पना ठासून भरलेल्या असल्याने ही संधी साधून
(मौकेका फायदा उठाना.) मी हा लेख लिहित आहे.
( आपण जर ‘गोम’ ही वाचली
नसेल तर आधी वाचून घ्या.)
१) “तर सांगायचा मुद्दा असा की सध्या
त्यांच्या मठीचे नाव आहे “गुरुत्वकण........”
आइन्स्टाईनच्या मते, पदार्थ त्याच्या
सभोवतालच्या स्थळ-काळाचे वस्त्र विकृत करते, ह्यालाच
गुरुत्वाकर्षण म्हणूयात. परंतु क्वांटम सिद्धांत सर्व शक्तींचे वर्णन तथाकथित
कणांच्या’ संदर्भात करते. गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत,
ते कण 'गुरुत्वकण' (graviton) म्हणून ओळखले जातात. अगदी अगदी अगदी लहान अंतरावर आइन्स्टाईनचे
गुरुत्वाकर्षण नियम लागू होत नाहीत. पण आइन्स्टाईनचे गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम
मेकॅनीक्सची गुरुत्वाकर्षणाची कल्पना ह्यांची सांगड अजून बसलेली नाही.
२)क्रिस्पर (CRISPR ) हे जेनेटिक्स मधील एक
साधन आहे. ह्याचा उपयोग शास्त्रज्ञ जीनोम संपादन(एडीट) करण्यासाठी करतात.
ज्याप्रमाणे लेखक .डॉक फाईलमध्ये बदल करू शकतात त्याच प्रकारे शास्त्रज्ञ मानवाच्या/सजीवांच्या/वनस्पतींच्या
गुणसूत्रात संपादन करून बदल करू शकतात. ह्या कथेत केलेले वर्णन सद्यस्थितीत
अतिरंजित वाटत असेल पण “ऑर्डरबरहुकुम बेबी” (designer
baby) बनवण्याचे दिवस जवळ आले आहेत.
मग हे शस्त्र आपण वापरायचे नाही? देवाने जी
घडी घातली आहे त्यात मानवाने किती हस्तक्षेप करावा. करावा कि नाही? ह्या प्रश्नावर वाद विवाद चालू आहेत. तसे हे खर्चिक काम आहे. त्यामुळे
श्रीमंत लोकांना ह्याचा अवाजवी फायदा होईल. म्हणजे एका नवीन “आहेरे” वर्गाचा उदय होईल. वर्गकलहाला तोंड फुटेल. सुप्रजनन
शास्त्राचे गाडलेले भूत तोंड काढील. असे आक्षेप आहेत. नाण्याची ही एक बाजू झाली.
तर कित्येक अनुवांशिक विकृतींवर आपण ह्या टेक्नोलॉजीच्या सहाय्याने
मात करू शकू. ही दुसरी बाजू! कल्पना करा की क्रिस्पर वापराला कायद्याने बंदी घातली.
मग अनुवांशिक दोषांमुळे (e.g. cystic fibrosis, sickle cell disease etc)पीडीत रुग्णांना ह्या टेक्नोलॉजीमुळे होणाऱ्या उपचारांपासून वंचित रहावे
लागेल ही भूमिका योग्य आहे का? तस पाहिलं तर मानव सुप्रजनन शास्त्राचा
उपयोग अनंत काळापासून करत आहे. कलमी फळे( –आंबा, पेरू, द्राक्ष इत्यादी) भरपूर दुध देणाऱ्या गाई,
निरनिराळ्या प्रकारची कुत्री, वाढीव मास देणारे
प्राणी-गाई, डुकरे, कोंबड्या- क्रिस्पर
यायच्या आधीपासून हे चालू आहेच. मग क्रिस्पर वापरायला काय हरकत आहे?
३) डी ब्राय drive -- प्रकाश हा लहरींनी
बनलेला असतो ही सर्वमान्य संकल्पना होती पण पुढे प्रकाश हा कणांनीही बनलेला असतो
ही कल्पना मांडण्यात आली. ह्या प्रकाश कणांना फोटॉन असे नाव देण्यात आले. डी
ब्राय( de Broglie) ह्या उमराव घराण्यात जन्मलेल्या फ्रेंच
शास्त्रज्ञाने 1924 साली अशी कल्पना मांडली कि वस्तूंचे अणू
रेणू हे प्रकाश प्रमाणे लहरींच्या स्वरुपातही असतात. ह्यालाच वस्तूंच्या लहरी
म्हणतात. (Material Waves) डी ब्राय ने electron च्या लहरींची समीकरणेही दिली. प्रयोगशाळेत ह्यांचे अस्तित्व सिध्द करणारे
प्रयोगही यशस्वी झाले. प्रकाश आणि इलेक्ट्रोन ह्यांच्या दुहेरी व्यक्तिमत्वाची –कण/ लहरी – संकल्पना आता सर्व मान्य आहे.
मात्र ‘डी ब्राय drive’ हे
फिक्शन आहे. कल्पना अशी आहे की प्रवासाला निघताना प्रवाशांचे वाहनासकट लहारीमध्ये
रुपांतर करायचे आणि मुक्कामाला पोहोचल्यावर पुन्हा उलट प्रक्रिया करायची. आता हे
विचारू नका की प्रवाशांच्या आत्म्याचे काय होते.
4) “अखेर मानवाने पाठवलेल्या संदेशांना उत्तर आलं होतं.” हे वाक्य SETI प्रोजेक्टच्या संदर्भात आहे. SETI
म्हणजे Search for Extra-Terrestrial Intelligence. SETI
Institute ही अमेरिकेतील संशोधन संस्था आहे. SETIचे शास्त्रज्ञ विश्वात बुद्धिमान जीवांचा छडा लावण्याचे काम करत आहेत.
ह्या संस्थेच्या रेडीओ टेलेस्कोप आकाशातून आपल्यासाठी कोणी संदेश पाठवत आहे का याची
पाहणी करत आहेत. विश्वात प्रगत समाज असावा व तो आपल्याला संदेश पाठवत असेल,
आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असेल तर आपणही त्याला प्रतिसाद
द्यावा हा ह्यामागील उद्देश आहे.
आपल्याला पटलंं तर अजून बरेच लिहायचे आहे. बघूया कसंं जमतेय.
Comments
Post a Comment