मानव आणि रोबोट

 मानव आणि रोबोट

ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या रोबोट: कथा आणि व्यथाह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत.

तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.

मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो. पण समाजाला हे परवडण्यासारखे नसते. त्यांच्या प्रतिभेला खच्ची करण्याची महत्वाची जबाबदारी शाळांवर असते. लहान मुलगी बारा तेरा वर्षांची होते तोपर्यंत ही प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होते. त्यांच्यावर देव, धर्म, राष्ट्र, समाज, रूढी, रिती, जात पात ह्यांची जाणीव करून दिली जाते. हे प्रोग्रामिंग मानव बी इ, एम बी ए वगैरे पर्यंत पूर्ण होतं.

हे कशासाठी करावे लागते? कारण कारखाने, राजकारण इत्यादींसाठी रोबोंटची नितांत गरज असते ती पुरी करण्यासाठी!

हे रोबोटमानव मग वरून एक कमांड आली की त्याप्रमाणे वागतात. ते ठराविक प्रसंगी हसतात, रागावतात, गहिवरून रडतात, एकत्र येऊन मोर्चां काढतात, जस ज्याचे प्रोग्रामिंग तसे त्याचे वागणे. आणि अखेर हे सगळे विसरून रात्री......

मग नविन रोबोटमानवाचा जन्म होतो.तर अशी विश्वाची आणि रोबोंच्या छटाक आयुष्याची, अदपाव सुखाची आणि मणभर दुःखाची सुरुवात झाली.

रोबोंटची उत्क्रांती होतच राहील.
त्यातून महारोबोट निर्माण होतील. ते स्वतःला रोबोट सेपियंस म्हणवून घेतील.
रोबोट सेपियंसच्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा म्हणजे होमो सेपयंस. होमो सेपयंस म्हणजे शहाणा माणूस! ही शहाणी माणसं त्यांच्या सर्वांचा रक्षणकर्ता, विश्वाचा चालक, मालक, पालक आहे त्या महान अतिसंगणकाला विसरतील........ते भूतकाळ विसरतील. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतील. जणुकाय नवीन शोध लावला ह्या कल्पनेने रोबोंटचा पुनराविष्कार करतील. प्रत्येक कामासाठी रोबोंटना राबवतील! स्वतः मात्र ऐशोआरामाचे जीवन जगतील. आपल्या अवयवांचा उपयोग न केल्यामुळे हात, पाय, कान, नाक, डोळे हे अवयव झडून जातील. सरते शेवटी शरीर, मन आणि प्रोसेसर विरहित होमो सेपिअन विचारस्वरुपात पृथ्वीवर भटकत राहतील. आणि त्यांची जागा देवानाम्प्रियदर्शी मत्प्रिय रोबोट घेतील. अश्या तऱ्हने रोबोटस शॅल इनहेरीट द अर्थ!!
पहा पटते आहे का. नाही पटणार कारण दहावी पास आणि बारावी नापास लेखकावर कोण विश्वास ठेवणार हो?

देवा, त्यांना क्षमा कर. कारण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांच्या प्रोग्रामिंगचे बळी आहेत!


 

Comments

Popular posts from this blog

कवटीत भुस्सा भरलेली माणसे. -२

आले,आले. पॉप कॉर्न परत आले भाग-२

काकडेच्या खुन्याची कथा.