असा मी असामी.भागो - एक अदृश्य माणूस
मी भानगौडा गोपाळगौडा पाटील. लोक मला भागो
म्हणतात. नाव विचित्र वाटतंय ना. आमच्याकडे अशीच नाव असतात,
पण हे “अदृश्य माणूस” हे प्रकरण काय आहे? तुम्ही काय नवीन शोध लावलाय आहे? म्हणजे
असं काही रसायन शोधून काढलाय का कि ते
प्यालं कि माणूस अदृश्य होतो. नाही तसं नाही. हे आपलं जन्मापासूनचं आहे. माझा जन्म
झाला तेव्हाच मी अदृश्य झालो. दवाखान्यात जो गोंधळ. बाळ गेलं कुठं? कुणी पळविला तर
नाही ना? आई रडायला लागली. मिडवाइफ़च्या तोंडचे पाणी पळाले. मग कुणीतरी बोलले, “अहो
बाळ तर इथे आहे.” अशी गंमत झाली.
आपलं एक आहे. जमेल तस जगायचं. जगायचा फारसा त्रास पण नाही. टेंशन नाही घ्यायचं.
भागो लकी आहात बुवा तुम्ही. कस काय जमत तुम्हाला. आम्हाला गुरुमंत्र द्या ना असला
तर.
आहे. पण त्याचं काय आहे जो मंत्र मला सूट झाला तो तुम्हाला होईलच ह्याची खात्री
नाही. प्रत्येकानं आपला मंत्र आपणच शोधून काढायचा.
ते ठीक आहे. पण तुमचा मंत्र काय आहे तो तरी कळू द्या ना. झालं. हा झाला गायब.
नाही नाही. मी इथेच आहे. माझा मंत्र ऐकायचा आहे ना. सांगतो. मी अखंड वाचत असतो.
दिवस रात्र. काय जे हाताशी लागेल ते. निवड वगैरे काही नाही. कामसूत्रा पासून
ज्ञानेश्वरी पर्यंत,
रेल्वे टाईम टेबल पासून तरला दलालच्या “आयर्न रीच” रेसिपी पर्यंत.
जागतिक बँकेच्या वार्षिक अहवालापासून विष्णूबोवा जोग महाराजांच्या सार्थ
“अमृतानुभव” पर्यंत.
...
...
आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर पेटी वाचनालय आहे. तिथे बाकड्यावर बसून सगळे पेपर
वाचून काढतो. पहिल्या पानाच्या वरच्या डाव्या कोपऱ्यापासून ते शेवटच्या पानाच्या
खाल्या अंगाला हे वर्तमानपत्र कुणी कुठल्या प्रेसमध्ये छापले इथपर्यंत. रस्त्यावर
सुद्धा किराणा दुकानाच्या बाहेर गोटा खोबरे, साल असलेली उडदाची डाळ, जेमिनीच्या
पाच लिटर डब्याचा भाव लिहिलेले वाचूनच पुढे पाउल टाकतो. आता तर काय रस्त्यावर जिथे
जागा मिळेल तिथे फलक लावलेले, अमक्याचा वाढदिवस अभिनंदन, ह्याची शाखाप्रमुख म्हणून
नेमणूक झाली अभिनंदन. आपले बहुमत आमच्या पॅनेललाच दया. उरूस काय नि विरोबाची
जत्रा.
काय वाचू नि काय नको.
पार्कमध्ये सुक्या भेळेचा पुडा घेतला. भेल खाऊन झाली कि पुड्याचा कागद वाचतो. हे
खूप रहस्यमय असत. म्हणजे आपण खुनाची बातमी वाचत असतो मग एकदम “पुढील मजकूर पान
चारवर.” पण पान चार तर आपल्या कडे नसते.
“त्यानंतर आरोपीने सुऱ्याने बायकोचे अकरा तुकडे... “
“पुढील मजकूर पान चारवर.”
अश्यावेळी खूप अस्वस्थ व्हायला होत. त्यानं बायकोचा खून का बरे केला असावा? त्या
अकरा तुकड्यांचे पुढे काय झाले असावे? विचार करण्यात सर्व रात्र जाते.
जशी रात्र कटते तसच आयुष्य पण कटते. थांबतो कारण हे फारच अवांतर झालं. पूर्वरंग
झाला आता उत्तररंगाकडे वळूया.
माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत हल्लीच एका नव्या लेखकाची भर पडली
आहे. भेदक आणि चमकदार लिखाण. त्यांनी लिहिलेलं एक ललित वाचून मला धक्का बसला. ह्या
लेखकाला मी केव्हा भेटलो? अगदी डिट्टो
मला समोर ठेवून ते ललित लिहिले गेले असणार. मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा मी मनोमन आढावा घेतला. तर त्यात ह्या नावाचा
कोणीही नव्हता. पण नंतर विचार केला कि हल्ली काय लोक टोपणनाव नाव घेऊन लिहितात.
मला ओळखणाऱ्या मोजक्या लोकांचा काय भरवसा? पण त्यात लेखक असा
कोणीही नव्हता. सगळे आपापल्या व्यापात गुंतलेले. लिहायला वेळ कुठून काढणार? बिचारा गुप्ते मुलांच्या शाळेच्या अॅडमिशनच्या विवंचनेत गुंतलेला. राजा राजमाचीकरचे इंग्लिश प्रेम जगजाहीर होते. तो कशाला मराठीत लिहून आपली पातळी खालावेल. राहता राहिला करंदीकर. रिकामटेकडा जीव. त्याची भंकस ऐकवायला त्याला मीच सापडायचो नेमका.
जेव्हा विडिओकान ("कान" च. कारण "कॉन" म्हणणे
बरोबर नाही.) वगैरे कंपन्यांचा उदय झाला नव्हता तेव्हाची गोष्ट आहे. करंदीकर मला
म्हणतो कसा, "हायला आज कपडे
धुवायला लागले."
"का? बाईने दांडी मारली काय?"
"नाही
हो, आमचे वाशिंग मशिन बंद पडलय."
"वाशिंग
मशिन? अमेरिकेतून आणले काय?"
"लग्नात
सासऱ्यांनी भेट म्हणून दिलं आहे. तुम्हाला नाही दिलं? भागो, तुम्ही फार भिडस्त आहात बुवा. आणि मागणार असाल तर डिशवाशरपण घ्या
मागून. पोळ्या बनवायचं, केर काढायचंपण
मशीन असत. हाय काय
नाय काय." करंदीकरने मला
मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला. "पण त्याची देखभाल इथं इंडियात कोण करणार?" मी माझी आपली
शंका बोलून दाखवली."कोण म्हणजे? हे काय विचारणं झालं. आपणच करायची."
"पण
मी मेकानिक थोडाच आहे?"
"अहो," त्याने खाजगी आवाज काढून मला सांगितले, "शिकून घ्यायचे. केल्याने होत आहे रे..."
आता करंदीकराने हा किस्सा सगळ्या ऑफिसात इंक्लुडिंग स्त्रीवर्गात
पसरवला असणार यात काडीमात्रही शंका नाही. ते काहीही
असो. पण मी काही सासऱ्यांकडे असली मागणी केली नाही , करणार नाही. ते माझ्या स्वभावात नाही. तत्वात बसत नाही.
पण मी का माझ्या डोक्याला खार लावून घेतोय? माझे तर अजून लग्न झालेले नाही. हा करंदीकर म्हणजे...
आपण माझ्या आवडत्या लेखकाकडे वळूया.
तो महान लेखक
पुढे काय लिहितो बघा.
"बालपणी डोळ्यात
चमक होती. ती जपून ठेवायला पाहिजे होती."
माझ्या
केसमध्ये काय झाले?
माझ्याही डोळ्यात
लहानपणी ती चमक होती. ते पाहून आईबाबाना काळजी वाटू लागली. आता ह्याचं काय होणार? कसं होणार? इथपासून ते ह्याच्याशी कोण लग्न करणार? इथपर्यंत. मग धरलं मला आणि गेले घेऊन चष्म्याच्या डॉक्टरकडे.
"डॉक्टर, जरा ह्याला तपासा बर. काही दिवसांपासून ह्याच्या
डोळ्यात निराळीच चमक दिसायला लागली आहे."
"अरेरे, खूप रेअर कंडीशन आहे ही. शेवटची केस पन्नास
वर्षापूर्वी चायनाच्या हुआंग हुंग मध्ये सापडली होती. ह्यामध्ये काय होता कि
डोल्यामदी एक ऑप्टिक नर्व्ह असणार. तीला बिमारी झाली असणार, काय? वेळेवर
उप्चार नाय केले तर मग मोठेपाणी ह्याला कालाचष्मा दिवसापण आणि रात्रीपण घालावा लागणार. तो आपला कोण फेमस पोलितिशिअन आहे?... गेला बिचारा. त्याला व्हती. पण घाबारायाचा कारण नाही. आपण
ह्याला बरोबर करणार. पोरा चल आतमंदी. तुझी ऑप्टोमेट्री करून
टाकू."
झालं.
अशाप्रकारे कोवळ्या वयात मला चष्मा लागला. डोळ्यातली चमक चष्म्याच्या आरशित उतरली.
चष्म्याच्या काचा चमकायला लागल्या. एकूण काय तर सध्या मी जो आहे, जसा आहे त्याचे श्रेय माझ्या आईबाबांना आहे. आता हा एक किस्सा वाचा म्हणजे तुम्हाला माझ्या व्यक्तिमत्त्वाची थोडी कल्पना येईल.
त्याचं काय झालं कि ऑफिसमधल्या सर्वांनी ठरवलं कि पार्टी तो बनतीही
है! कशासाठी? कशासाठी असं
नाही. सगळ्यांनी ठरवलं म्हणून. पण स्थळ? आहे एक स्थळ. विनापाश विनापत्य अश्या एकमेवाद्वितीय मिस्टर भागोचा
फ्लॅट. अरे पण त्याला विचारायला नको? त्याची परवानगी घ्यायला नको? कशाला. तो काय आपल्याला नाही थोडाच म्हणणार आहे?
मग ठरलं तर. शनिवारी रात्री भागोच्या फ्लॅटवर पार्टी! रात्री नऊ
वाजता सगळे दारुकामाचे सामान घेऊन जमले. कुणी
बाटल्या आणल्या. कुणी भेळ, फरसाण आणले.
मन्या स्टार्टर घेऊन आला. मीठ लाऊन कांद्याचे पाSSSSतळ काप तयार झाले. उतारा जवळ असावा म्हणून लिंबं चिरून ठेवली होती.
पार्टी सुरु
झाली. हळूहळू रंगात आली. लोकं मोकळी झाली. अद्वातिद्वा रिमार्क टाकू लागली. जनरल
मॅनेजर पासून इष्टमित्रमैत्रिणीलेकीसुनापोरीबाळांसह सर्वांचा उद्धार करण्यात आला.
मन्या कशाला तरी म्हणून
उठला आणि तोल जाऊन खाली पडला.
"चढलीरे चढली
मन्याला." सगळे ह्या ह्या करून हसायला लागले. मन्या कसाबसा उठला आणि जागेवर बसला.
"माझा फिजिकल
बॅलंस गेला असेल पण मेंटल बॅलंस पक्का आहे." अस बोलून त्याने पेपर ओढला. खिशातून पेन
काढून त्याने लिहिले. २+२=५. "पक्या, वाच लेका. बरोबर आहे ना? दोन अधिक दोन बरोबर पाच."
सगळ्यांनी
विचार करून होकार भरला. म्हणाले, "तथास्तु."
अश्या गप्पा
गोष्टी होता होता मध्य रात्र उलटून गेली.
मग कुणाला तरी माझी आठवण झाली शेवटी. "हायला, भागो कुठाय?"
"आत्ता तर इथे
होता. गेला कुठे?" इति करंदीकर.
"अरे असा कसा
दिसला तुला? तो पार्टीला
आलाच नाही. म्हणी इथे होता."
"आपण बोलावलाच
नाही तर तो यील कसा. चुकलच आपलं."
"पण भागो म्हणजे
ए वन झंटलमन माणूस. कुणाच्या ना अध्यात ना मध्यात. चुपचाप ऐकून घेणारा. त्याला आपण
नाही बोलावलं? असं कसं विसरलो
आपण?"
आत्ताही मी
चुपचाप ऐकून घेतच होतो की.
"मी तर त्याला
नायट्रोजन वायू म्हणतो. कलरलेस, टेस्टलेस, ओडरलेस. निव्वळ गुळाचा गणपती."
छान. येऊ द्या अजून.
ठीक आहे. अजून
काही?
"उद्या आपण
त्याची क्षमा मागायला पाहिजे."
"मंजूर!"
बसल्या जागीच
सगळे एकेक करून ढेर झाले. मन्याला जरा जास्त झाली असणार कारण त्याने तिथेच ओ केली.
बादलीभर पाणी टाकून मॉप घेऊन मी ती साफ केली आणि झोपलो.
सकाळी सगळे
उठले. मी सगळ्यांसाठी चहा केला.
"भागो तू हे
बरोबर केलं नाहीस. पार्टीला आला नाहीस."
एकूण मंडळींचा
फिजिकल बॅलंस परत आला होता, पण मेंटल बॅलंस?
"अरे होतो ना.
मस एन्जॉय करत होतो तुमच्या संगतीनं."
"अबे ओ फेकू.
होतास म्हणतोस म आम्हाला दिसला कसा नाहीस?"
मंडळी तोच
तर माझा प्रॉब्लेम आहे!
Comments
Post a Comment