डार्कलँड.
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते. व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच. पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.” लोकांना उगीचच थांबायला लावणे यात अवर्णीय आनंद असतो. आपण सगळीकडे थांबत असतो. डॉक्टरकडे, सरकार दरबारी, बसच्या थांब्यावर, सिनेमाच्या तिकिटाच्या लाईनीत. सगळ्यात गंमत म्हणजे आपण थांबतो आणि नंबर लागला कि वर पैसे पण देतो. सिनेमा! तिथं तर तिकीट मिळाले तरी हॉलचे दरवाजे उघडायची वाट पहावी लागते. दरवाजे. “मी तेच सांगितले सर. तर तो म्हणाला, “आम्ही थांबत नसतो. साहेब बाहेर आला नाही तर मलाच आत यावं लागेल.”” अरे व्वा. हा म्हणजे “काळाचा” कळीकाळ दिसतोय. काळ कुणासाठी थांबत नाही. कटकट साली. “पांडू, त्याला सांग कि साहेब म्हणतोय कि साक्षात यमराज ...